काँग्रेसच्या टूलकिट प्रकरणी दिल्ली पोलिसांनी ट्विटरच्या दिल्ली येथील कार्यालयावर छापा टाकला, त्यामुळे खळबळ उडाली. सोमवारी, २४ मे रोजी ही महत्वाची कारवाई करण्यात आली. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. पोलिस जेव्हा ट्विटरच्या दिल्लीतील कार्यालयात पोहचले, तेव्हा कार्यालयात कोणीही नव्हते, कार्यालय बंद होते. कारण मागील वर्षाच्या मार्च २०२० पासून कोरोनाच्या कारणाने सर्व कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्यास सांगितले आहे.
छापा नव्हे नोटीस दिली!
याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी खुलासा केला आहे. आम्ही ट्विटरच्या कार्यालयात सहज भेट दिली आहे. आम्ही ट्विटरच्या कार्यालयावर छापा टाकला नसून नोटीस देण्यासाठी आलो आहे. कारण या प्रकरणी ट्विटर इंडियाने त्यांची बाजू स्पष्ट केलेली नाही, असे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे.
(हेही वाचा : धक्कादायक! कोरोना बनले काँग्रेसचे ‘हत्यार’! मोदींच्या बदनामीसाठी ‘टूलकिट’!)
काय आहे हे प्रकरण?
काँग्रेस पक्षाच्या लेटरहेडवर ‘कोरोना महामारीचा ‘राजकीय शस्त्र’ म्हणून वापर करून यामाध्यमातून देशात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बदनामी करण्यासंबंधी टूलकिट प्रसिद्ध केली होती, ती भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ता संबित पात्रा यांनी ट्विटद्वारे जाहीर केली होती. त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. त्यावर ट्विटरने ‘म्यॅन्युपिलेटेड मीडिया’ असा शेरा मारला होता. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या नोटिशीत, ‘ट्विटरने हा शेरा मारण्याआधी त्याची खातरजमा केली का’, असा प्रश्न विचारला आहे.
Join Our WhatsApp Community