अर्धांगवायूच्या झटका आलेल्यांवर मोफत उपचार करा! शिवसेनेची मागणी

मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये अर्धांगवायूचा झटका आलेल्या रुग्णांवर विहित वेळेत उपचार करण्यात यावेत आणि हे उपचार करताना त्या रुग्णांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्याकडे उपलब्ध असलेली केशरी किंवा पिवळ्या रंगाची शिधापत्रिका तथा आधारकार्ड आदी पुरावे ग्राह्य धरून तातडीने मोफत करण्यात यावेत, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेवकाने केली आहे.

रुग्णांवर तातडीने कारवाई करण्याची आवश्यकता

शिवसेनेचे नगरसेवक सचिन पडवळ यांनी ठरावाच्या सुचनेद्वारे ही मागणी केली आहे. त्या सुचनेबाबत बोलतांना त्यांनी, ‘अर्धांगवायूचा झटका आलेल्या रुग्णांवर अगदी कमी वेळेत म्हणजेच साडेचार तासांच्या आत उपचार होणे अत्यंत गरजेचे असते. अन्यथा, अशा रुग्णांना त्यांच्या शारीरिक अवयवांना मुकावे लागण्याचा संभव असतो. अशाप्रकारे झटका आलेल्या रुग्णाला उपचारार्थ आरटीपीए हे इंजेक्शन साडेचार तासांच्या आत दिल्यास, त्यांचे शारीरिक अवयव बाधित होण्याची शक्यता अगदीच कमी असते. परंतु, या इंजेक्शनची किंमत ५० हजार रुपये इतकी असते. पण महानगरपालिकेच्या रुग्णालयांत आलेल्या रुग्णांकडे ऐनवेळी तेवढी रक्कम असतेच असे नाही, किंबहुना गरीब रुग्णांसाठी हा खर्च त्यांच्या आवाक्याबाहेरचा असतो. गरीब रुग्णांच्या वैद्यकीय उपचारासाठी शासकीय योजना असल्या तरी, अशा योजनेंतर्गत अर्धांग वायूचा झटका आलेल्या रुग्णाच्या उपचारासाठी येणाऱ्या खर्चासाठी ठराविक वेळेत मंजुरी मिळत नाही. परिणामी, वेळेत उपचार मिळण्यास विलंब झाल्यामुळे, रुग्ण कायमस्वरुपी अधु होण्याची दाट शक्यता असते.

(हेही वाचा : पावसाळी शेड चार महिन्यांकरता कशाला? वर्षभराकरता परवानगी द्या! भाजपची मागणी)

ही कागदपत्रे पुरावे म्हणून ग्राह्य धरावीत

महानगरपालिका आरोग्य सेवेवर कोट्यवधी रुपये खर्च करीत असताना, आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या अशा रुग्णांना दिलासा देणारी उपाययोजना करणे नक्कीच हितावह आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये, अर्धांगवायूचा झटका आलेल्या रुग्णांवर ठराविक वेळेत करावयाचे उपचार व्हावे यासाठी त्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्याकडे उपलब्ध असलेली केशरी किंवा पिवळ्या रंगाची शिधापत्रिका, आधारकार्ड इत्यादी कागदपत्रे ग्राह्य मानून तातडीने मोफत करण्यात यावेत, अशी मागणी पडवळ यांनी केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here