बांगलादेशात (Bangladesh) भारतीय टीव्ही चॅनेलच्या (Indian TV channels) प्रसारणावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भातील एक रिट याचिका बांगलादेशातील उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. केबल टेलिव्हिजन नेटवर्क ऑपरेशन ऍक्ट २००६ अंतर्गत हिंदुस्थानी टीव्ही चॅनेलच्या प्रसारणावर बंदी घालण्यासाठी निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. तसेच या याचिकेत भारतीय टीव्ही चॅनेलच्या प्रसारणासंदर्भात काही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. (Bangladesh)
बांगलादेशात हिंदुस्थानी टीव्ही चॅनेलच्या प्रसारणामुळे बांगलादेशी संस्कृती आणि समाजावर प्रभाव वाढला आहे. ही चिंतेची बाब आहे असा दावा याचिकाकर्ते इखलास उद्दीन भुईयाँ (Ikhlas Uddin Bhuiyan) यांनी या याचिकेत केला आहे. बांगलादेशात हिंदुस्थानी टीव्ही चॅनेलवर बंदी घालण्याचा नियम का जारी केला जाऊ नये? अशी विचारणादेखील या याचिकेतून करण्यात आली आहे. माहिती प्रसारण मंत्रालय, गृह मंत्रालयाचे सचिव, बांगलादेश दूरसंचार नियामक आयोग आणि इतरांना या याचिकेत प्रतिवादी करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. या अर्जावरील सुनावणी बांगलादेश उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती फातिमा नजीब आणि न्यायमूर्ती सिकंदर महमुदूर रझी यांच्या खंडपीठात होण्याची शक्यता आहे. (Bangladesh)
मिळालेल्या माहितीनुसार, दाखल करण्यात आलेल्या रिट याचिकेत स्टार जलशा, स्टार प्लस, झी बांगला, रिपब्लिक बांगला आणि इतर सर्व भारतीय टीव्ही चॅनेलवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. भारतीय टीव्ही चॅनेलच्या माध्यमातून प्रक्षोभक बातम्या प्रसारित केल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. बांगलादेशी संस्कृतीला विरोध करणाऱ्या मजकुराचे अनियंत्रित प्रसारण होत असल्यामुळे त्यांचा परिणाम तरुण पिढीवर होत असल्याचं या याचिकेत म्हटलं आहे. तर या वाहिन्या कोणतेही नियम न पाळता चालवल्या जात आहेत, असा गंभीर आरोप याचिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे आता या याचिकेवर न्यायालय काय निर्णय देणार? याकडे अनेकांचं लक्ष लागलेलं आहे. (Bangladesh)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community