छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील आणि आजोबांच्या समाधी स्मारकांचा विकास करण्याची मागणी; Samajwadi Party ला उपरती

उत्तर प्रदेशातील आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक बांधणार आहे, त्याच धर्तीवर या मराठा वीर पुरुषांच्या समाधी स्थळी स्मारक बांधून परिसराचा विकास करावा, अशी मागणी भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राव्दारे केली आहे.

61

औरंगाजेबाचे उदत्तीकरण केल्यामुळे समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) आमदार अबू आझमी यांना विधीमंडळ अधिवेशनात अर्थसंकल्पीय अधिवेशन काळापुरते निलंबित करण्यात आले होते. समाजवादी पक्षाचे मुंबईचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाच्या कार्यपध्दतीचे कौतुक केलेले असतानाच त्यांच्या पक्षाचे आमदार रईस शेख यांनी ‘स्वराज्याचे संस्थापक’ छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजी राजे भोसले आणि आजोबा मालोजी भोसले यांची अनुक्रमे ‘होदगिरे’ आणि ‘वेरूळ’ येथील समाधी स्मारके साडेतीनशे वर्षे उपेक्षित असल्याने त्यांचा जिर्णोद्धार करण्याची मागणी केली आहे. राज्यशासन ज्याप्रमाणे उत्तर प्रदेशातील आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक बांधणार आहे, त्याच धर्तीवर या मराठा वीर पुरुषांच्या समाधी स्थळी स्मारक बांधून परिसराचा विकास करावा, अशी मागणी भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राव्दारे केली आहे.

समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन केले, त्यांचे वडील शहाजी भोसले (इ. स. १५९४-१६६४) यांना इतिहासात ‘स्वराज्य संकल्पक’ म्हटले जाते. दक्षिणेत अत्यंत पराक्रम गाजवलेल्या शहाजी भोसले यांचे शिकारी दरम्यान घोड्यावरुन पडून अपघाती निधन झाले. त्यांची समाधी कर्नाटकातील होदगिरे येथे आहे. या समाधी स्थळाचा जिर्णोद्धार करण्याची महाराष्ट्र व कर्नाटकातील अनेक सरकारांनी घोषणा केली, प्रत्यक्षात समाधी उपेक्षित आहे. बेळगाव सीमाभागातील मराठी -कन्नड वादाचा समाधी स्थळाच्या विकासाला फटका बसला आहे.

(हेही वाचा कर्करोग्यांसाठी असलेली इमारत पाडली; Bombay High Court संतापले; BMC वर केली ‘ही’ कारवाई)

छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजी भोसले (इ. स. १५५२-१६०५) यांची समाधी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरुळ येथे घृष्णेश्वर मंदिर परिसरात आहे. या परिसरात घाणीचे साम्राज्य असून येथे साधा फलकही नाही. मालोजी भोसले यांनी तत्कालीन अहमदनगरच्या निजामशाहीचा वजीर मलिक अंबर यांच्या साथीने आदिलशाही विरोधातील लढ्यात मोठा पराक्रम केला होता. शिवाजी महाराजांनी पुणे-सुपे जहागिरीतून स्वराज्याचे रणशिंग फुंकले, ती जहागीर मालोजी भोसले यांना मिळालेली होती.

मालोजी भोसले यांच्या येथील गढीला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा आहे, तसा दर्जा समाधीला देण्यात यावा. कर्नाटकातील शहाजी राजे यांचे स्मारक केंद्रीय संरक्षित स्मारक आहे. शहाजी राजे यांच्या समाधी स्थळाच्या विकासासाठी केंद्र सरकारला विनंती करावी. तसेच वेरूळ व होदगिरी या दोन्ही समाधी स्थळांचा उत्तर प्रदेशात आग्रा येथील नियोजित छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या धर्तीवर स्मारक बांधून विकास करण्यात यावा, अशी मागणी आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.

एका बाजुला समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब हे चांगले प्रशासक होते, अशा शब्दांत त्यांचे उदत्तीकरण केले होते. त्यामुळे त्यांचे विधीमंडळ अधिवेशन कालावधीकरता निलंबन केले होते. त्यातच रईस शेख यांनी शिवाजी महाराजांचे वडील आणि आजोबांच्या समाधी स्मारकांचा विकास करण्याची मागणी केल्याने एक प्रकारे समाजवादी पक्षावर (Samajwadi Party) पडलेला छत्रपती शिवाजी महाराज विरोधी असल्याचा  डाग  या माध्यमातून पुसण्याचा प्रयत्न केला जात आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.