एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन अद्याप नाही, पगारासाठी शासनाने तात्काळ निधी देण्याची मागणी  

मे २०२१ चे देय असलेले एसटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन, तात्काळ देण्यासंदर्भातील उचित कारवाई शासनाकडून व्हावी, अशी मागणी देखील करण्यात आली आहे.

112

एसटी कर्मचाऱ्यांना मे महिन्याचे वेतन आर्थिक अडचणीमुळे एसटी प्रशासन देऊ शकले नाही. त्यामुळे भविष्यात येणाऱ्या आर्थिक अडचणींचा सामना करण्यासाठी, शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाकरिता पुढील सहा महिन्यांसाठी निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे केली आहे. 

कर्मचा-यांमध्ये असंतोष

महामंडळातील कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेला वेतन दिले जाते. मात्र मे २०२१चे वेतन ७ जून २०२१ पर्यंतसुद्धा कर्मचाऱ्यांना अदा करण्यात आलेले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. एक तर एसटी कर्मचाऱ्यांना इतरांच्या तुलनेत खूपच कमी पगार आहेत. त्यामुळे त्यांच्या संसाराचा गाडा चालवण्यासाठी जर ठरलेल्या तारखेला पगार मिळाले नाहीत, तर त्यांना अनेक अडचणी निर्माण होतात.

काय आहेत मागण्या?

कोरोना  प्रादुर्भावामुळे एसटी वाहतूक बंद असल्याने, गेली सव्वा वर्ष महामंडळाला प्रवासी उत्पन्न मिळत नाही. महामंडळ आर्थिक संकटात सापडले असून, एसटी कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी महामंडळाकडे निधी उपलब्ध नाही. तसेच, त्यामध्ये अजून काही महिने फार मोठा फरक पडेल, अशी परिस्थिती नाही. तरी एसटी वाहतूक पूर्ववत चालू होईपर्यंत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शासनाने एसटी महामंडळाला अर्थसहाय्य करावे, यासाठी सर्व संबंधित मंत्री, लोकप्रतिनिधी यांनी स्वतः प्रयत्न करावेत. तसेचे मे २०२१ चे देय असलेले एसटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन, तात्काळ देण्यासंदर्भातील उचित कारवाई शासनाकडून व्हावी, अशी मागणी देखील करण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे कोषाध्यक्ष संतोष गायकवाड हे सुध्दा हजर होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.