भाजपचे केंद्रात सरकार येताच लोकशाही धोक्यात! अजित पवारांचा हल्लाबोल 

शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना स्वाभिमानाने केली. राष्ट्र हा व्यापक विचार ठेवून पक्षाची स्थापना केली. अनेक क्षेत्रांत काम करणाऱ्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांची फळी त्यांनी उभी केली, असे अजित पवार यावेळी म्हणाले.

भाजपचे केंद्रात सरकार आल्यानंतर देशाच्या एकतेला धक्का देण्याचे काम सुरू आहे. केंद्रात भाजपाचे सरकार आल्यापासून देशात एकता, अखंडता आणि सर्वधर्मसमभावाच्या विचारांना धक्का देण्याचे काम सुरु आहे. लोकशाही व्यवस्था आणि राज्यघटनेला झुंडशाहीचे धक्के देऊन मोडून काढण्याचा प्रयत्न सुरु असून हे गंभीर आहे, पत्रकारितेची अवस्था गंभीर आहे. सर्व पत्रकार एकाच सुरात बोलत आहेत, हे बघून लोकशाही धोक्यात आहे, असे वाटते, अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. राष्ट्रवादीच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

बेकारी, महागाईच्या विरोधात संघर्ष करावा! 

आपण अशा देशविरोधी, समाजविरोधी विचारांना ठामपणे विरोध केला पाहिजे, त्याचा रस्त्यावर उतरुन विरोध केला पाहिजे. देशातील या अवस्थेचा परिणाम राज्यावर होत आहे. मे महिन्यात राज्याच्या तिजोरीत १४ हजार कोटी आले, त्यातील १२ हजार कोटी पगारात जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीदेखील वाढल्या. मनमोहन सिंग सरकार असताना ७५ रुपये पेट्रोलचा दर होता तो १०५ रुपये झाला आहे. गॅस सिलिंडर ४०० वरून ९०० रुपये झाला आहे. टीव्ही चॅनेलसाठी ५०० रुपये भरावे लागत आहेत. अनेक तरुण बेरोजगार झाले आहेत. आपल्याला या बेरोजगारी, महागाईविरोधात संघर्ष करायचा आहे, असेही अजित पवार म्हणाले.

( हेही वाचा : राज्यातील सरकार पाच वर्षे टिकेल! शरद पवारांचा आत्मविश्वास )

राष्ट्रवादी महाराष्ट्राच्या मातीशी नाते सांगणारा पक्ष!  

जातपात पंथ भेदभाव न करता राष्ट्रवादीची वाटचाल सुरू आहे. आव्हाने येत असतात. शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना स्वाभिमानाने केली. राष्ट्र हा व्यापक विचार ठेवून पक्षाची स्थापना केली. अनेक क्षेत्रांत काम करणाऱ्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांची फळी त्यांनी उभी केली. या सगळ्यांमुळेच पक्षाचा वर्धापन दिन साजरा करतोय, असे अजित पवार यावेळी म्हणाले. राष्ट्रवादी महाराष्ट्राच्या मातीशी नाते सांगणारा पक्ष आहे, जनतेशी नाळ जुळलेला हा पक्ष आहे. आज कोरोनाचे संकट आहे. सरकार स्थापन केल्यावर चार महिन्यात कोरोनाचे संकट आले. विरोधक वेगवेगळा प्रचार करतात पण सर्वोच्च न्यायालयाने, मुंबई उच्च न्यायायलयाने कौतुक केले आहे. जगात काय चालले आहे हे आपण पाहिले, तसेच देशात यमुना, गंगेच्या तीरावरील दुर्दैवी चित्र आपण पाहिले, असे अजित पवारांनी यावेळी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here