बिनबुडाचे…राजकारणी की आपण सर्व?

माणूस हा कितीही प्रगत झाला तरी त्याचे जंगली गुण काही केल्या संपूर्णपणे जाणार नाहीत. थोडक्यात माणूस हा टोळीपद्धती नुसार राहणारा, टोळीप्रमुखाच्या हुकमावर चालणारा... कदाचित हुकूमशाहीप्रमाणे. मग लोकशाही माणसावर लादली गेली असे तर नाही ना!

सुरुवात करताना म्हणतो “माफ करा थोडे तिखट आहे, पण अत्यंत सत्य आहे. मोजकेच चेहरे सोडले तर सर्व राजकीय व्यक्ती/ पक्ष/ गट इत्यादी बिनबुडाचे आहेत.” निव्वळ पक्ष किंवा नेते मंडळीबद्दल मी बोलतोय असे नाही, तर माझे मत सरसकट बहुतांशी राजकीय लोकांबद्दल आहे. त्यात खूप चांगले लोक सुद्धा आहेत, त्या व्यक्तीं इथे अपवाद आहेत…

“कोणी नाही रंजले गांजले,
गरजेनुसार आम्ही सर्व…
लोकशाही जत्रेत नांदले”
असेच काहीसे धोरण असते राजकीय व्यक्तींचे आणि त्यांच्या तत्कालीन पक्षाचे (कधी कोण कुठल्या पक्षात जाईल याचा नेम नसतो, त्यांना सत्ता कुठे जाणार हे खूप अगोदर कळते). कधी कोण कुठल्या पक्षात जाणार आणि कोण पक्ष कोणा बरोबर युती करणार हे सोयीनुसार ठरते.

(हेही वाचा : सर्वसामान्य जनता, भेसळ आणि आरोग्य!)

इतिहासातील काही खास उदाहरणं अशी…

  • सध्याची महाराष्ट्रातील शिवसेना- काँग्रेस- राष्ट्रवादी युती
  • काश्मीरमधील PDP आणि भाजप युती
  • उत्तर प्रदेशातील बहुजन पक्ष आणि भाजप युती
  • एकदोन दिवसाची भाजप-राष्ट्रवादी युती
  • 1989 चे CPI (M) जनता दल-भाजप युती
  • समाजवादी राष्ट्रीय जनता पक्ष (चंद्रशेखर यांचे केंद्रातील सरकार) आणि काँग्रेस पाठींबा

सत्ताधारी विरुद्ध कधीकाळी एकमेकांचे तोंड न बघणारे सर्व राजकीय विरोधी पक्षाची मोट…एक ना अनेक उदाहरणे आहेत. हे झाले राज्य तसेच केंद्र पातळीवरच्या बिनबुडाच्या घटना…पण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे पालिका ते ग्रामपंचायत पातळीवर पक्षाला न जागणारे अनेक आहेत. तसे पक्षीय पातळीवर काही ठिकाणी काँग्रेस-भाजप युती सुद्धा आहे. कुठे गट फुटतो तर कुठे पक्ष. कुठे अपेक्षा पूर्ण न होण्यासारख्या खडतर वाटा असतात म्हणून पक्ष बदल, तर कुठे नेता गेला म्हणून पाठी जाणारे कार्यकर्ते… “कारण बहुतांशी स्वारीचा स्वर असे स्वार्थाचा नव्हे सत्तेचा”. सदर कोलांट्या खेळात समाजसेवा इत्यादीबद्दल काही वाटत असते का मंडळींना? उत्तर काय तर “नाही”! म्हणायला समाजसेवा करतात हे लोक, पण हे प्रमाण कितपत आहे? मज्जा मज्जा आहे ना!!!

(हेही वाचा : माझा कचरा – माझी जबाबदारी!)

लोकशाहीचा खेळ कसा चालतो?

निव्वळ निवडणुका जवळ आल्या की राजकीय मांडणी सुरू होते. सत्ताधारी खुलेपणे म्हणतात “काम करायचे तर शेवटच्या वर्ष-दोन वर्षात, अगोदर केले तर लोक विसरून जातात”. म्हणून राजकीय महाशय निवडणूकीच्या काही काळ अगोदर स्वार्थाची गणिते (ज्याला त्याच्या भाषेत समाजसेवा म्हणतात) मंडळी मांडत असतात. PR एजन्सी इत्यादीवर खर्च सुरू होतो. दिखाव्याचा बाजार सुरू होतो. सोशल मीडिया ऍक्टिव्ह होतात. उदघाटन, आश्वासने सुरू होतात. सत्ताधारी गाजरे दाखवायला सुरवात करतात. विरोधक आक्रमक होतात. विरोधक ‘सत्ताधारी कसे वाईट’, यावर बोलत असतात. सत्ताधारी ‘आम्ही कसे पांढरे’, हे रंगीत कागदावर सांगत असतात. पण राजकीय बहुरूपी व्यक्तिमत्वाची रूपे तिकीट खिडकीवर उघडी पडतात. काही दिवसात एकमेकांना पाण्यात बघणारे एकाच विहिरीवर पाणी भरायला लागलेले असतात. दुसऱ्या बाजूला, अगदी एकत्र ग्लासात बसणारे अचानक एकमेकांची डोकी फोडायला तयार असतो. कोणी कधी मित्र आणि कोण कोणाचा शत्रू, सामान्य माणसाला कळेपर्यंत सर्व काळे कावळे स्वार्थाची भुरी केळी खायला एकत्र बसलेले असतात. निवडणुकीच्या बाजारात वेळे नुसार रोज बदल होत असतात. गांधीजींच्या नावाने आणि साक्षीने हे सर्व बिनधास्तपणे होत असते. महात्मा हळहळतात तरी पण पुढे  निवडणुका होतात…पुन्हा गणिते बदलतात. पुन्हा गणितज्ञ एकत्र येतात. कदाचित शत्रू मित्रांची अदलाबदल होते. जनतेचा कौल संपलेला असतो आणि जनतेची गरज सुद्धा. जनता रागाने म्हणते आता पुढच्याला बघतो म्हणत विसरून सुद्धा जातो.

लोकशाही म्हणजे हेच का? 

आमच्या एका मित्राने मांडलेल्या लॉजिकनुसार ” लोकशाही ही नैसर्गिक पद्धती नव्हे”! मी सहमत आहे त्यांच्या उरफाट्या वाक्याशी. कारण माणूस हा प्राणी आहे, कितीही प्रगत झाला तरी! त्याचे जंगली गुण काही केल्या संपूर्णपणे जाणार नाहीत. थोडक्यात माणूस हा टोळी पद्धती नुसार राहणारा, टोळीप्रमुखाच्या हुकमावर चालणारा… कदाचित हुकूमशाही प्रमाणे. मग लोकशाही माणसावर लादली गेली असे तर नाही ना! मी म्हणेन “हो! लोकशाही ही लादलेली व्यवस्था आहे, इथे नकळत आपण कोणाच्या हुकुमाच्या तालावर नाचत असतो ज्याला कदाचित नेता म्हणतात. हुकूमशाही किंवा हुजूरशाही प्रमाणे हाजी हाजी इथेही चालते. एखाद्या मंत्र्याची गाडी चालली की व्यवस्था-सिस्टिम कशी काशीला गुंडाळून ठेवतात, हे सर्वांना ज्ञात आहे. राजाची स्वारी असल्याप्रमाणे नेते मंडळी बागडत असतात. लक्षात घेण्यासारखे अजून एक लक्षण, लोकशाहीत असलेली घराणेशाही म्हणजे आधुनिक राजेशाहीचे स्वरूप. इथे पैशाने मोठे असलेले घराणे, पक्ष किंवा गट चालवत असतो आणि जनता दावणीला बांधलेली असते किंवा जनतेने स्वतःहून ह्या राजे लोकांच्या दावणीला बांधून घेतलेले असते. त्यात तुम्ही म्हणाल लोकशाहीत बोलायचं चालायचं स्वातंत्र्य आहे, पण कितपत खरे आहे हे…कायदा नावाचा प्रकार राजकीय पक्ष आपल्या पद्धतीने राबवत असतो हे सत्य आहे कदाचित! सुडाचे राजकारण, त्रास देणारे सत्ताधारी व्यवस्था ही पक्ष बदलतात, पण पद्धती चालूच राहते. कधी मी आत कधी तू, अशा पायघड्या चालू असतात. ह्यांना कंट्रोलमध्ये ठेवायला एक स्तंभ, एक व्यवस्था म्हणजे न्यायव्यवस्था आहे, पण ती सुद्धा बऱ्याचदा वादाच्या भोवऱ्यात सापडते. न्यायालयीन केस कोणासाठी रात्री उभी राहते, तर कोणी सामान्य माणूस आडवा होतो तरी त्याची केस उभी राहत नाही. हे सत्य आहे. न्याय उशिरा होणे अर्थात त्याला काही कारण असू शकते पण…( न्यायव्यवस्थेबद्दल मी बोलणे नको).  दुसऱ्या बाजूला लोकशाहीच्या नकारात्मक बाजूला सकारात्मकतेची जोड आहे, पण त्याचे प्रमाण किती आहे? बिनबुडाचे राजकारणी हा राजकारण्यांचा स्थायी गुण नाही, तर त्याला कारण आहेत दोन गोष्टी. एक तुमच्या- माझ्यामुळे आणि दुसरे माणसाच्या सत्ता राबवणाच्या स्थायी स्वभावामुळे, म्हणजे एका माणसाला दुसऱ्या माणसावर अधिकार गाजवायचा असलेला स्वभाव. थोडक्यात बिनबुडाचे फक्त राजकारणी नाहीत. तर आपण सर्व सामान्य नागरिक सुद्धा आहेत. आपल्याला कोणीही येते आणि कोणीही हाकून, मारून जाते. जोपर्यंत आपली मानसिकता बदलत नाही तोपर्यंत राजकारण्यांचा सर्कशीचा खेळ चालूच राहणार आणि आपण माकडे मूळ स्वभावानुसार नाचतच राहणार. लोकशाही भिंत चांगली रचली आहे, पण वीट सरकतेय, भिंत पडायला नको. आपण बिनबुडाचे सामान्यजन आहेत, राजकारण्यांना बिनबुडाचे बोलायचा अधिकार आहे का? माझ्यासकट आपल्या सर्वांना???

(भारतीय लोकशाहीबद्दल आदर आहे, पण बाबासाहेबांनी उभी केलेली लोकशाही कुठे भरकटते की काय म्हणून हा विषय! कदाचित काही लोकांना आवडणार नाही, पण आपण सर्व बिनबुडाचे आहेत हे सत्य आहे, काही सन्मानीय लोक आणि राजकारणी अपवाद असतील. जमेची बाजू स्वतःचा कुठलाही स्वार्थ न ठेवणारी काही लोक आहेत म्हणून हा “सिस्टीम” प्रकार जीवित आहे. तसेच प्रॅक्टिकल बोलायचे तर व्यवहारीपणे राहणारे राजकारणी सुद्धा परवडले इतकाच काय तो समाधानाचा भाग…)

(हेही वाचा : शून्य सांडपाणी व्यवस्थापन…आणि बरेच काही!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here