परबांनू आता सांभाळून रवा…

142

गेल्या काही महिन्यांमध्ये महाविकास आघाडी आणि विशेषत: शिवसेनेला अंगावर घेणारे भाजपा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आता उद्धव ठाकरे यांचे स्वीय्य सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांना चांगलाच दणका दिला आहे. सीआरझेड नियमांचं उल्लंघन करुन मिलिंद नार्वेकर यांच्या मुरुड येथील बंगल्याचे बांधकाम केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. मात्र आता त्या बंगल्यावर कारवाई सुरू झाली आहे. तसेच आता पुढची कारवाई परिवहन मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टवर करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

नार्वेकरांचा पहिला नंबर

दापोली मधील मुरुडच्या समुद्र किनाऱ्यावर नार्वेकर यांचा हा बंगला आहे. या बंगल्याच्या बांधकामासाठी सीआरझेडच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याची तक्रार किरीट सोमय्या यांनी केंद्रीय पर्यावरण विभागाकडे केली होती. नार्वेकरांच्या बंगल्यासोबतच अन्य देखील बंगल्यांचा यामध्ये समावेश आहे, ज्याबद्दल तक्रार करण्यात आलेली आहे. आता प्रत्यक्ष कारवाई सुरू झाल्यानंतर पहिला क्रमांक हा नार्वेकरांच्या बंगल्याचा लागल्याचे दिसून आले आहे.

(हेही वाचाः कोकणात जाणा-यांसाठी राणे सोडणार फुकट ट्रेन)

पुढचा नंबर परबांचा

मिलिंद नार्वेकर यांचा मुरुड दापोलीच्या समुद्र किनारी अलिशान बंगला होता. हा बंगला पाडण्याचे काम आज सकाळपासूनच सुरू करण्यात आले. जेसीबी मशीन लाऊन हा बंगला तोडण्यात आला आहे. या बंगल्याची प्रत्येक भिंत न् भिंत पाडण्यात आली आहे. किरीट सोमय्या यांनी या कारवाईचा व्हिडिओ ट्वीट करुन माहिती दिली आहे. तसेच हा बंगला किती प्रमाणात तोडला याची पाहणी करण्यासाठी सोमय्या स्वत: दापोलीत जाणार आहेत. दरम्यान, आज नार्वेकर यांचा बंगला तोडण्यात आला आहे. आता पुढचा नंबर राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या रिसॉर्टचा असल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे. सोमय्या यांनी तसे ट्वीटच केले आहे.

(हेही वाचाः आता यशोमती ठाकूर अजित दादांवर नाराज)

काय होता सोमय्यांचा आरोप?

नार्वेकर यांच्या बंगल्याप्रकरणी सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी आरोप केले होते. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मर्जीतल्या मिलिंद नार्वेकर यांनी दापोलीत मुरुड गावाच्या समुद्र किनाऱ्यावर 72 गुंठा जागा घेतली. तिथे कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता बेकायदेशीररित्या दुमजली बंगल्याचे काम जोरात सुरू केले आहे. मोठ्या प्रमाणात जंगलाची, झाडांची नासधूस सुरू आहे. तसेच मोठं उत्खननही चाललं आहे, असा आरोप सोमय्या यांनी केला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.