डेंग्यू आजाराच्या प्रसारास प्रतिबंध करणा-या बाबी अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी ‘मुंबई अगेन्स्ट डेंग्यू’ या भ्रमणध्वनी ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. डेंगी प्रतिबंधात्मक काळजी घेण्याबाबत प्रभावी माहिती साध्या सोप्या भाषेत देणा-या नवीन ‘भ्रमणध्वनी ॲप’चे लोकार्पण करण्यात आले असून पुढील सुमारे ४८ तासांत हे ॲप ‘प्ले स्टोअर’च्या माध्यमातून मुंबईकरांच्या सेवेत रुजू होणार आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या कीटकनाशक विभागाच्या पुढाकाराने व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सहकार्याने तयार करण्यात आलेल्या ‘मुंबई अगेन्स्ट डेंग्यू’ या भ्रमणध्वनी ॲपचे लोकार्पण महापालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्याहस्ते पार पडले. या कार्यक्रमाला उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कु-हाडे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे, कीटकनाशक अधिकारी राजन नारिंग्रेकर, उप कीटकनाशक अधिकारी चेतन चौबळ, माहिती तंत्रज्ञान विभागातील व्यवस्थापक अरुण चव्हाण, ॲप विकसित करणा-या ‘आय रियॅलिटीज’ या कंपनीचे प्रसाद आजगांवकर आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
(हेही वाचा शिंदे गट झाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’, उद्धव ठाकरेंच्या हाती आली ‘मशाल’)
अत्याधुनिक भ्रमणध्वनी ॲप
या प्रसंगी बोलतांना, डॉ. संजीव कुमार यांनी डेंगी विषयक प्रतिबंधात्मक काळजी घेण्याविषयी नियमितपणे विविध स्तरिय जनजागृती देखील महापालिकेद्वारे सातत्याने करण्यात येत असते. याच जनजागृतीला आता अत्याधुनिक भ्रमणध्वनी ॲपचे पाठबळ लाभत आहे, ही निश्चितच एक सकारात्मक गोष्ट आहे. मात्र, हे ॲप प्रत्येक मुंबईकर कुटुंबातील किमान एका सदस्याच्या भ्रमणध्वनीमध्ये असायलाच हवे, अशी आग्रही विनंती त्यांनी केली. लोकार्पित करण्यात आलेले ‘मुंबई अगेन्स्ट डेंग्यू’ हे भ्रमणध्वनी ॲप तांत्रिक कार्यपद्धतीनुसार पुढील साधारणपणे २४ ते ४८ तासांत ‘गुगल प्ले स्टोअर’सह अन्य प्लॅटफॉर्मवर मोफत उपलब्ध असेल असेही त्यांनी नमुद केले.
प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महानगरपालिकेचे कीटकनाशक अधिकारी राजन नारिंग्रेकर यांनी प्रास्ताविक करताना, डेंग्यू उत्पत्ती व प्रसार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती दिली. तसेच डेंग्यूशी लढा देताना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी ही अत्यंत प्रभावी ठरते. त्यामुळेच डेंग्यू आजाराच्या प्रसारास प्रतिबंध करणा-या बाबी अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी ‘मुंबई अगेन्स्ट डेंग्यू’ या भ्रमणध्वनी ॲपची निर्मिती करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community