राजकीय ‘वादळाला’ उधाण… पवार काका-पुतण्यांचा केंद्रावर टीकांचा ‘पाऊस’

केंद्राने कोणत्याही राज्यासोबत दुजाभाव न करता मदत दिली पाहिजे.

97

पूरपरिस्थितीमुळे राज्यातील अनेक भागांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक पिके वाहून गेल्यामुळे शेतक-यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यातील शेतक-यांना तातडीने मदत करण्यासाठी राज्य सरकारकडे सर्व स्तरांतून मागणी करण्यात येत आहे. यावरुन राज्यात राजकीय वादळ सुरू झालं असताना त्याचं वारं आता दिल्लीपर्यंत पोहोचू लागलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुतणे व राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राज्यातील नुकसानाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे. यावेळी पवार काका-पुतण्यांचा केंद्र सरकारवर असलेला टीकेचा रोखही स्पष्टपणे दिसून येत आहे.

केंद्राने दुजाभाव करू नये

राज्यातील पूरपरिस्थितीबाबत केंद्राला माहिती देऊन मदत मागितली जाते. मात्र किती मदत द्यायची हा सर्वस्वी केंद्राचा निर्णय आहे. काही काही राज्यांना केंद्राने न मागता स्वतःहून हजारो कोटींचे पॅकेज दिले होते. केंद्र सरकार हे संपूर्ण देशाचे आहे. त्यामुळे केंद्राने कोणत्याही राज्यासोबत दुजाभाव न करता मदत दिली पाहिजे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

(हेही वाचाः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांसाठी राज्य सरकारची ‘ही’ भूमिका)

केंद्राने बघ्याची भूमिका घेऊ नये

तर दुसरीकडे आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करत राज्यातील पूरपरिस्थितीची माहिती देत केंद्र सरकारचे दार ठोठावले आहे. आर्थिक अडचण असतानाही राज्य सरकारने दोन महिन्यांपूर्वी जशी आपत्तीग्रस्तांना भरीव मदत दिली, तशीच मदत आज मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रालाही देईल, असा विश्वास आहे. केंद्र सरकारनेही किमान आता तरी बघ्याची भूमिका न घेता अन्नदात्याला मदत करण्यासाठी आपली जबाबदारी उचलावी, अशी मागणीवजा टीकाही त्यांनी ट्वीट करत केली आहे.

न भरुन येणारं नुकसान

आधी कोकण, पश्चिम महाराष्ट्र नंतर मराठवाडा व विदर्भ आणि आता पुन्हा मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र… अतिवृष्टीने शेतकऱ्याला पूर्णत: घायाळ केलंय. सोयाबीन, कापूस, ऊस या पिकांचं आतोनात झालेलं नुकसान हे न भरुन निघणारं आहे. अगदी हातातोंडाशी आलेला घास या संकटाने हिरावलाय, अशा शब्दांत रोहित पवार यांनी राज्यातील शेतक-यांची व्यथा मांडली आहे.

(हेही वाचाः पंचनाम्यांचे सोपस्कार होत राहतील, आधी मदत करा! राज ठाकरेंचे राज्य सरकारला पत्र)

वेळीच उपाययोजनांची गरज

बदलतं हवामान आणि वाढत्या आपत्ती बघता शेतीत शाश्वत उत्पन्न राहिलेलं नाही. शेतीसमोरील आव्हाने अतिशय किचकट होणार आहेत. त्यामुळं भविष्यात शाश्वत आणि परवडणाऱ्या शेतीसाठी नवीन धोरण आणि योग्य उपाययोजनाही वेळीच आखाव्या लागतील, हेही तेवढंच खरंय. असे मत मांडत त्यांनी सरकारला आवाहन केले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.