DCM Ajit Pawar : इर्शाळवाडी दरड दुर्घटना; उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून दु:ख व्यक्त

167
DCM Ajit Pawar : इर्शाळवाडी दरड दुर्घटना; उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून दु:ख व्यक्त
DCM Ajit Pawar : इर्शाळवाडी दरड दुर्घटना; उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून दु:ख व्यक्त

रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खालापूरनजिक इर्शाळवाडी परिसरात गावावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने तात्काळ बचाव व मदतकार्य सुरु केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याची पाहणी केली, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळीच मंत्रालयात जाऊन आपत्कालिन नियंत्रण कक्षाची सूत्रे स्विकारत, बचाव व मदतकार्याचे संनियंत्रण केले.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नियंत्रण कक्षातून दुर्घटनास्थळावर उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांना बचाव, मदतकार्यासाठी हेलिकॉप्टरसह आदी यंत्रणा तात्काळ उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही पूर्ण केली. दुर्घटनास्थळी उपस्थित मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून त्यांनाही नियंत्रण कक्षास प्राप्त झालेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली.

दरम्यान, इर्शालवाडी परिसरात घडलेल्या या दुर्घटनेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून ही दुर्घटना मन पिळवटून टाकणारी, विषण्ण करणारी असल्याचे म्हटले आहे. बचाव पथकाने अनेकांना ढिगाऱ्याबाहेर काढून त्यांचा जीव वाचवला आहे, परंतु काही नागरिक अजूनही ढिगाऱ्याखाली असून त्यांनाही बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. जखमी नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आवश्यक वैद्यकीय उपचार केले जात आहेत. सर्व जखमी नागरिक लवकर बरे व्हावेत यासाठी अजित पवार यांनी प्रार्थना केली आहे. तर दुसरीकडे दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या बांधवांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिली असून त्यांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदना व्यक्त केली आहे.

(हेही वाचा – पीओपी गणेशमूर्तीकरांच्या पोटावर पाय देऊ नका; हिंदू सणात विघ्न आणणारे धाडसत्र थांबवा!)

…म्हणून वाढदिवस साजरा करणार नाही

रायगड जिल्ह्यातील इरसालवाडी येथे घरांवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून यावर्षी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस असून राज्यभरातील त्यांचे चाहते, कार्यकर्ते, हितचिंतक दरवर्षी मोठ्या प्रमाणावर हा वाढदिवस साजरा करतात. इरसालवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कुणीही आपला वाढदिवस साजरा करु नये. पुष्पगुच्छ, होर्डींग, जाहिरातींवर खर्च न करता तो निधी इरसालवाडी गावाच्या पुनर्उभारणी आणि ग्रामस्थांच्या मदतीसाठी उपयोगात आणावा, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.