खऱ्या शिवसेनेच्या सोबतीने मुंबई पालिकेवर भगवा फडकवणार – फडणवीस

172

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत १५० जागा जिंकण्याचे लक्ष्य आखून दिल्यानंतर, आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पालिका निवडणुकीत शिंदे गटासोबत युतीची घोषणा केली आहे. खऱ्या शिवसेनेच्या सोबतीने मुंबई पालिकेवर भगवा फडकवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

( हेही वाचा : पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या रखडल्या; दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा?)

मराठी मतांचे ध्रुविकरण रोखण्यासाठी शिंदे गट आणि मनसेची युती घडवून आणत भाजप स्वबळावर मुंबई महापालिका निवडणूक लढेल, असा कयास राजकीय वर्तुळात बांधला जात होता. माध्यमांतूनही तशा बातम्या प्रसारित होत होत्या. परंतु, खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करीत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. ‘मुंबई महानगरपालिकेत भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील खरी शिवसेना एकत्र निवडणूक लढणार आणि भगवा फडकवणार’, अशा आशयाचे ट्वीट त्यांनी मंगळवारी केले.

शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसला

अमित शहा यांच्या उपस्थितीत सोमवारी मुंबईत भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या सभेला संबोधित करताना अमित शहा यांनी आक्रमक पवित्रा घेत उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंनी आम्हाला कशाप्रकारे धमक्या दिल्या, हे तुम्हाला माहीत असेलच. राजकारणात सर्वकाही सहन करा पण धोका पत्करू नका. त्यासाठी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने मैदानात उतरावे. २०१४ मध्ये शिवसेनेने केवळ दोन जागांसाठी युती तोडली होती. २०१९ मध्ये शिवसेनेने आमच्या जागा पाडून पाठीत खंजीर खुपसल्याचे अमित शहा म्हणाले.

‘अभी नहीं तो कभी नहीं’ – फडणवीस

आगामी मुंबई महापालिका निवडणूक ही आपल्यासाठी शेवटची निवडणूक आहे, असा विचार करून लढा. मूळ शिवसेना आमच्यासोबत आली आहे. आता एकच टार्गेट आहे, ते म्हणजे मुंबई महानगरपालिका. ‘अभी नहीं तो कभी नहीं’ हे ध्यानात मैदानात उतरा, असा कानमंत्र देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांना दिला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.