Sony Group : जपानच्या सोनी समूहाला फिल्मसिटीत येण्याचे देवेंद्र फडणवीसांकडून निमंत्रण

आपला ५ दिवसांचा दौरा आटोपून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवारी २६ ऑगस्टला मुंबईत परततील

106
Sony Group : जपानच्या सोनी समूहाला फिल्मसिटीत येण्याचे देवेंद्र फडणवीसांकडून निमंत्रण
Sony Group : जपानच्या सोनी समूहाला फिल्मसिटीत येण्याचे देवेंद्र फडणवीसांकडून निमंत्रण

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जपान भेटीच्या शुक्रवारच्या शेवटच्या आणि पाचव्या दिवशी सोनी, डेलॉईट आणि सुमिटोमो कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या भेटी घेतल्या आणि त्यांच्यासोबत सहकार्य करण्यास महाराष्ट्र इच्छूक असल्याचे सांगितले. सोनी समूहाला फिल्मसिटीत येण्याचे तसेच आयआयटी मुंबईशी संशोधनाच्या क्षेत्रात सहकार्य करण्याची विनंती त्यांनी केली, तर बांधकाम क्षेत्रात काम करणार्‍या सुमिटोमोला मुंबई ट्रान्सहार्बर लिंकमुळे तयार होणार्‍या तिसर्‍या मुंबईत असलेल्या संधींची माहिती दिली.

आपला ५ दिवसांचा दौरा आटोपून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवारी २६ ऑगस्टला मुंबईत परततील. तत्पुर्वी शुक्रवारी त्यांनी सोनी ग्रुप कार्पोरेशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष शिरो कॅम्बे यांची भेट घेतली. तंत्रज्ञान आणि कंटेट क्षेत्रात महाराष्ट्रासोबत काम करण्याची सोनीची इच्छा आहे. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सोनी हा भारतातील सुद्धा विश्वसनीय ब्रँड आहे. मुंबई ही भारताची करमणूक राजधानी असून, आमच्या फिल्मसिटीच्या विकासासाठी अनेक योजना आहेत. या फिल्मसिटीमध्ये तंत्रज्ञान सहाय्य सोनीने द्यावे, अशी विनंती त्यांनी केली.

शिरो कॅम्बे यांनी ८० च्या दशकात मुंबईत काम केल्याच्या स्मृतींना यावेळी उजाळा दिला. संशोधनाच्या क्षेत्रात अधिक गुंतवणूक करणार असल्याचे सांगत निश्चितपणे त्यात महाराष्ट्राला प्राधान्य असेल, असे त्यांनी सांगितले. आयआयटी मुंबईने सुद्धा संशोधनाच्या क्षेत्रात मोठी गती घेतली आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगत सोनीला आयआयटी-मुंबईसोबत संशोधनाच्या क्षेत्रात सहकार्य करावे, असे आवाहन केले.

(हेही वाचा – Zepto Success : झेप्टो इंडिया २०२३ मधील पहिली युनिकॉर्न कंपनी)

डेलॉईट तोहमत्सु समूहासमवेत भेट

डेलॉईट तोहमत्सु समूहाच्या ईको नागात्सु यांचीही आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. ग्रीन हायड्रोजन, कचर्‍यातून वीजनिर्मिती, लॉजिस्टीक, इलेक्ट्रीक व्हेईकल, हायस्पीड रेल्वे, स्टार्टअपस इत्यादी क्षेत्रांत यावेळी चर्चा झाली. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज महाराष्ट्रात जपानच्या मदतीने अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प राबविले जात आहेत. डेलॉईट ज्या पद्धतीने सेमिनार आयोजित करते, तसेच ते मुंबई आणि पुण्यात सुद्धा व्हावेत. तुमच्या सहकार्यातून अधिकाधिक जपानी गुंतवणूकदार महाराष्ट्रात यावेत, हाच आमचा प्रयत्न असेल. अशी गुंतवणूक आकर्षित करणे आणि या प्रक्रियेतील गतिरोध दूर करणे, यासाठी एक जपानकेंद्रीत चमू आम्ही गठीत करणार आहोत. ‘टोकियो टेक’ सारख्या आयोजनांसाठी महाराष्ट्र सरकारसोबत भागिदारी करण्यासारख्या पर्यायांवर सुद्धा यावेळी तपशीलवार चर्चा करण्यात आली.

सुमिटोमोचा पुढाकार

सुमिटोमो रियालिटी अँड डेव्हलपमेंट कंपनीचे अध्यक्ष कोजुन निशिमा यांचीही आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. धारावी पुनवर्सन प्रकल्पाबाबत राज्य सरकार करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिली. एमटीएचएलमुळे मोठ्या प्रमाणात नवीन आवास क्षेत्र उपलब्ध होणार असून, तिसरी मुंबई ही पुढच्या काळात मोठी संधी असेल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सुमिटोमोचे अध्यक्ष कोजुन निशिमा यांनी यावर्षी अखेरपर्यंत आपण मुंबईत निश्चितपणे भेट देऊ, असे सांगितले. मेट्रो स्थानकानजीक उंच इमारती बांधण्यासाठी सुमिटोमोने उत्सुकता दर्शविली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.