शिवसेना-राष्ट्रवादीचे निकालाआधीच ठरले होते…; देवेंद्र फडणवीस यांची टीका

181

२०१९ च्या विधानसभा निवडणुका भाजप-शिवसेनेने एकत्र लढविल्या. पण, निकालापूर्वीच शिवसेना-राष्ट्रवादीचे ठरले होते. त्यामुळे मी उद्धव ठाकरेंना वारंवार फोन करूनही, त्यांनी ते घेतले नाहीत, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

( हेही वाचा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यास सज्ज व्हा, भाजपचे कार्यकर्त्यांना आवाहन)

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या समारोपसत्रात ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, सेनापतीच्या मागे कार्यकर्ते भक्कमपणे उभे राहिले, तर लढाई जिंकता येते. पण इकडे सेनापती झाल्यानंतर मागचे सरदार पळून गेले. अशा शब्दांत त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचे अचानक ठरले नाही, तो निर्णय आधीपासूनच झाला होता. सत्तेसाठी नाही तर विचारांसाठी परिवर्तन झाले आहे. युतीच्या काळात आम्ही शिवसेनेविरोधातील बंडखोर उमेदवार मागे घेतले. पण निकालापूर्वीच शिवसेना-राष्ट्रवादीचे ठरले होते. निकाल येण्याआधीपासूनच आपले सर्व मार्ग खुले आहेत, असे शिवसेना नेते सांगत होते. नंबर गेमसाठी शिवसेनेने ही भूमिका घेतली नाही, असा दावा फडणवीसांनी केला.

अडीच वर्षे सूड उगवण्याचे काम केले

महाविकास आघाडीच्या लोकांनी भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांवर खटले दाखल केले. पण कोणी घाबरले नाही. अडीच वर्षे त्यांनी फक्त सूड उगवण्याचे काम केले. आमच्या विरोधात बोललात, तर घर तोडू, पोलिसी खाक्या दाखवू, असा त्यांचा कार्यक्रम होता. अन्याय, अत्याचाराची परिसीमा त्यांनी गाठली. पण आपण सातत्याने संघर्ष केला. त्यामुळे आता महाराष्ट्राची जनता खुला श्वास घेत आहे, अशी टीका फडणवीसांनी केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.