कोरोना काळात राजकारण थांबलं नसलं, तरी लोकांद्वारे निवडून येणा-या लोकप्रतिनिधींनी सामाजिक भान राखणे गरजेचे आहे. त्यामुळे राजकीय कार्यक्रमांना गर्दी करू नये, असे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही वारंवार याबाबत सूचना केल्या आहेत. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी शनिवारी आपल्या पक्षाचा वर्धापन दिन अतिशय साध्या पद्धतीने ऑनलाईन साजरा करत, आदर्श घालून दिला.
पण त्यांच्या याच आदर्शाचे पालन, खुद्द त्यांचे सहकारी असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून काही होऊ शकले नाही. ज्या अजित पवारांनी सकाळी लोकांना नियम पाळायचे सल्ले दिले, त्याच उपमुख्यमंत्र्यांनी पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनात कोरोनाच्या नियमांनाच ‘सुरक्षित अंतरावर’ ठेवले. त्यामुळे एकीकडे मुख्यमंत्री आपल्या पक्षाचा वर्धापन दिन साधेपणाने करुन लोकांना नियम पाळायला सांगत आहेत, पण दुसरीकडे उपमुख्यमंत्रीच त्यांचं ऐकताना दिसत नाहीत, असंच म्हणावं लागेल.
काय झाले नेमके?
पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी सकाळी बैठक घेतली. त्या बैठकीत त्यांनी लोकांना नियम पाळण्यासाठी आवाहन केले. नियमांचा भंग करणा-यांची हयगय न करता त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले नाही, तर नाईलाजाने निर्बंध अधिक कठोर करावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला. पण त्याचनंतर अवघ्या काही तासांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याला त्यांनी हजेरी लावली. त्यावेळी तिथे मोठी गर्दी उसळली होती. सुरक्षित अंतर राखण्याचा तर, ‘दूर-दूर’ पर्यंत संबंध नव्हता. त्यामुळे राजकीय कार्यक्रमांकडे कोरोना फिरकतही नाही का, असा प्रश्न जनता उपमुख्यमंत्र्यांना विचारत आहे.
(हेही वाचाः सरनाईकांचा ‘पत्र’प्रताप… म्हणाले, शिवसेनेने भाजपशी जुळवून घेतलेले बरे!)
मुख्यमंत्र्यांची गर्दी नाही, दर्दी
एकीकडे उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात बेजबाबदारपणा झाला असला, तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र जबाबदारीने वागत, ‘मी जबाबदार’ची त्यांची घोषणा सत्यात उतरवली. शनिवार 19 जून रोजी शिवसेनेचा 55वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या सोहळ्याला एरव्ही महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून, मुंबईतील शिवसेनेच्या गडावर शिवसैनिक हजेरी लावत असतात. पण कोरोना परिस्थिती बघता मुख्यमंत्र्यांनी वर्धापन दिन ऑनलाईन साजरा करत, राजकीय पक्षाचं सामाजिक भान दाखवून दिलं. इतकंच नाही तर, महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांना त्यांनी कोरोनाला हरवण्यासाठी गर्दी टाळण्याचे आवाहन केले. सध्या राजकारण बाजूला ठेवा, या परिस्थितीत स्वबळाची भाषा करत असाल, तर लोक जोड्याने हाणतील, असे म्हणत त्यांनी स्वबळाचा नारा देणा-यांची हवा काढली. त्यामुळे अजित पवारांनी पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनावेळी जमवलेल्या गर्दीनंतर संध्याकाळी उद्धव ठाकरेंचं हे ‘दर्दी’ भाषण त्यांना चांगलीच दाद मिळवून देणारं ठरलं.
(हेही वाचाः स्वबळावर सत्ता आणू म्हणाल, तर लोक जोड्याने मारतील! उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला टोला )
पुणे हॉटस्पॉट
कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये पुण्यातील रुग्णसंख्येला चांगलीच भरती आली. एकट्या पुण्यात तब्बल 10 लाख 38 हजार 982 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातच म्युकरमायकोसिसची टांगती तलवार सुद्धा आहेच. त्यामुळे पुणे तिथे, काही नाही उणे, ही म्हण कोरोनाच्या संख्येच्या बाबतही पुण्याने खरी करुन दाखवली आहे. पण तरीही आपले कार्यकर्ते नाराज होऊ नयेत म्हणून आपण उद्घाटनाला आलो, असे म्हणत उपमुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन केले.
पण कार्यकर्त्यांची ‘नाराजी’ सांभाळताना, त्यांच्या गर्दीवर कोरोना ‘मेहेरबान’ झाला, तर काय होईल? हाही विचार उपमुख्यमंत्र्यांनी करायला हवा…
(टीपः वरील सल्ला आमचा नसून, ती एक पुणेरी पाटी आहे…)
(हेही वाचाः पुण्यात विकेंड लॉकडाऊन! अजित पवारांची घोषणा )
Join Our WhatsApp Community