मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी घेतलेल्या सभेत भाजपवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या शपथविधीचा उल्लेख केला. त्यानंतर आता यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे. मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या भूमिकेवर बोलण्यात मला रस नाही, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय
त्यावेळी पहाटेचा शपथविधी यशस्वी झाला असता तर आज तुम्हीही नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्या मांडीला मांडी लावून बसला असता, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस आणि भाजपला लगावला होता. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार येऊन आता अडीच वर्ष झालं आहे. या काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. सरकार आलंय काम करतंय. आता जो शपथविधी सकाळी 8 वाजता झाला त्याला पहाटेचा शपथविधी असं कसं म्हणता येईल, त्यामुळे यावर आता मला काही बोलायचं नाही, योग्य वेळ आली की मी बोलेन असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
(हेही वाचाः “तुमचं हिंदुत्व खोटं! उद्धव ठाकरे हे डरपोक”, सोमय्यांचा मुख्यमंत्र्यावर हल्लाबोल)
वेळ आल्यावर बोलेन
मी मागच्या वेळीही सांगितलं आहे की मला जेव्हा योग्य वाटेल तेव्हा मी बोलेन, आता मला ते सांगावंसं वाटत नाही. जेव्हा मला बोलावंसं वाटत नाही, तोपर्यंत अजित पवार बोलणार नाही. मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी आपण बोलणार असल्याचे सांगितले आहे. ते जर बोलले नसते, तर मुख्यमंत्री का बोलत नाहीत, असा काहींनी त्याचा अर्थ काढला असता. ते राज्याचे प्रमुख आहेत त्यांनी काय भूमिका मांडायची हे त्यांचे मत आहे. त्यामुळे ते जे काही बोलले त्यावर प्रतिक्रिया देण्यात रस नाही, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
(हेही वाचाः …तर बाळासाहेबांनी अशा लोकांना जमिनीत गाडले असते, राणांचा मुख्यमंत्र्यावर संताप)
Join Our WhatsApp Community