राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सरकारकडून नागरिकांना मास्क लावण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणी कायमंच मास्क वापरून नियमांचं पालन करण्याचा सल्ला देणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. राज ठाकरेंना कोरोनाची लागण झाल्यामुळे आवाहन करुनही मास्क न वापरल्यामुळे कोरोना झाल्याची टीका अजित पवार यांनी नाव न घेता केली आहे.
काय म्हणाले अजित पवार?
राज ठाकरे यांच्यावर 1 जून रोजी लिलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. पण त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे आता यावरुनच अजित पवार यांनी नाव न घेता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका केली आहे. काही काही राजकीय नेते आवाहन करुन देखील मास्कचा वापर करत नव्हते. त्यांना दुस-यांदा कोरोना झाला. शस्त्रक्रिया करायला गेले आणि कोरोना झाल्याचे कळले, त्यामुळे आता दिवस वाया गेले. त्यामुळे असं कोणाबाबतीत होऊ नये, प्रत्येकाने मास्कचा वापर करावा. मी आणि मुख्यमंत्री सार्वजनिक ठिकाणी जास्तीत जास्त मास्कचा वापर करत असतो, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
याआधीहा केली होती टीका
कोरोनाचे नियम शिथिल होण्याआधी मी मास्क वापरत नसल्याचे विधान राज ठाकरे यांनी केले होते. तेव्हाही अजित पवार यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. तुम्हाला कोरोना होणार नाही, पण तुमच्यामुळे दुस-याला होईल त्याचं काय, अशी टीका त्यांनी त्यावेळी केली होती.
Join Our WhatsApp Community