एसटी कर्मचाऱ्यांना वेळेत पगार देण्याची जबाबदारी आम्ही घेतली आहे. यासोबतच त्यांना चांगला पगार देण्याचाही प्रयत्न करू. त्यामुळे त्यांनी आता संप मागे घेवून कामावर रुजू व्हावे, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. जोपर्यंत एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण होत नाही तोवर संप मागे घेतला जाणार नाही, अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. ३१ मार्चपर्यंत कामावर रूजू व्हा नाहीतर कारवाई केली जाईल असा इशारा अजित पवार यांनी याआधी दिला होता. मात्र त्यानंतही कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. आता पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.
(हेही वाचा – राज ठाकरेंना शरद पवारांनी पाठवलेय का?)
…तर त्याकडे लक्ष देऊ नका
पुण्यातील इंदापूर येथील एका कार्यक्रमात रविवारी अजित पवार म्हणाले, आता तुमच्या मुलाबाळांचीही शाळेत जाण्याची अडचण होत आहे. त्यामुळे संपाबाबत कुणी काही वेगळे सांगत असेल तर त्याकडे लक्ष देऊ नका. एसटी कर्मचाऱ्यांना अनेकवेळा सांगितले आहे की, तुम्हाला चांगला पगार देण्याचा आपण प्रयत्न करू. आमच्या मुलाबाळांना शाळेत जाण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यांना गिरणी कामगारांचे उदाहरण मी दिले आहे. त्यांचा पगार वेळेत मिळेल याची जबाबदारी घेतलेली आहे, असेही अजित पवार म्हणाले आहेत. कोणी जर काही सांगत असेल तर त्याकडे लक्ष देऊ नका. कोणी वेगळ्या प्रवाहात जात असेल त्यांना मुख्य प्रवाहात आणूया. असे अजित पवारांनी म्हटले आहे.
पवारांनी राज ठाकरेंना दिले जोरदार प्रत्युत्तर
शरद पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही. सर्व धर्म समभाव असे राजकारण त्यांनी केले आहे. उगाच बदनामी करायची. आपण काय केले?, असा सवाल करत अजित पवारांनी राज ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काहीजण म्हणत होते हे सरकार पडणार, मात्र, अडीच वर्षे झाली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी खुप चांगल्याप्रकारे परिस्थिती हाताळली आहे, असे अजित पवार म्हणाले.
Join Our WhatsApp Community