उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने शिंदे गटाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत, त्यावर सुनावणी झाली तेव्हा मुख्य न्यायमूर्ती एम.व्ही. रामण्णा यांनी महत्वाचे निष्कर्ष नोंदवले आहे, जे काही प्रमाणात शिंदे गटाच्या बाबत अडचणीचे आहेत. आधीच न्यायालयीन प्रक्रियेमुळे शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार रखडला आहे. त्यातच सर्वोच्च न्यायालयाने नव्याने काही निष्कर्ष नोंदवले आहेत. त्यामुळे दिल्लीत धावपळ सुरु झाली, म्हणून कदाचित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तातडीने दिल्ली बोलावण्यात आले असावे, अशी सूत्रांची माहिती आहे.
सध्या शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा विषय रखडला आहे. हा विषय विरोधकांसाठी टिकेचा बनला आहे. त्यातच सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी वाढत चालली आहे. अशा सर्व परिस्थितीत दिल्लीत घडामोडींचा वेग आला आहे. गुरुवारी, ४ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डॉक्टरांनी सततच्या धावपळीमुळे एक दिवसाचा सक्तीचा आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यातच देवेंद्र फडणवीस हे गुरुवारीच दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे चर्चेला चांगलेच उधाण आले आहे. फडणवीस नक्की कोणत्या कारणासाठी दिल्लीला गेले आहेत, त्यावर तर्क वितर्क लढवले जाऊ लागले आहेत.
(हेही वाचा ईडीच्या कोठडीत राऊतांचा श्वास गुदमरतोय)
मंत्रिमंडळ विस्तार पुढे ढकलला?
६ ऑगस्टला राज्यपालांचा नियोजित दिल्ली दौरा आहे. ७ तारखेला मुख्यमंत्री दिल्लीमध्ये निती आयोगाच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. त्यामुळे त्याआधी मंत्रिमंडळ विस्तार करण्याच्या हालचाली सुरू होत्या. बुधवारी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी रविवारच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे स्पष्ट केले होते. परंतु, सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर मुहूर्त पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.