केंद्रीय तसेच राज्याच्या यंत्रणांना चौकशी करायचा अधिकार आहे. मात्र, काही नेते जे बोलतात, तेच कसे काय घडते? त्याच नेत्यांवर कारवाई कशी काय होते? असा सवाल करत, भाजप व केंद्रीय तपास यंत्रणांवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हल्लाबोल केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर होऊ नये
गेल्या काही दिवसांपासून राज्यात राज्य सरकार विरुद्ध केंद्रीय तपास यंत्रणा हा सामना रंगल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली. यावर आरोप करत अजित पवार म्हणाले की, केंद्राच्या यंत्रणांना छापेमारी करण्याचा अधिकार आहे. मागे काहींनी कोणावर कारवाई होणार यावर सुतोवाच केला होता आणि त्याप्रकारे कारवाई होते, अशाप्रकारे कोणाचा हस्तक्षेप नसावा. मात्र काही जण आधीच टीम कुठे जाणार असे सांगतात. केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर होऊ नये, हीच माफक अपेक्षा आहे, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे.
( हेही वाचा: अनिल परबांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत- संजय राऊत )
राजकीय सुडापोटी कारवाई नको
अनिल परब यांच्यावर कोणत्या प्रकरणी कारवाई सुरु आहे, मला माहिती नाही. पण राजकीय सुडापोटी कारवाई नको. यंत्रणांच्या कामात पारदर्शीपणा पाहिजे. माझ्याही नातेवाईकांवर केंद्रीय तपास यंत्रणांनी चौकशीची कारवाई केली होती. तपास पारदर्शी होत असेल, तर कुणाची ना नाही, असे अजित पवार यावेळी म्हणाले.
Join Our WhatsApp Community