उपसभापती नीलम गोऱ्हेंनी झापले, तरीही आमदार फोनमध्ये व्यस्त

99

विधानपरिषदेचे कामकाज सुरू असताना बरेच सदस्य सभागृहात मोबाईलवर बोलताना दिसतात. त्याची गंभीर दखल घेत उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी यापुढे सभागृहात मोबाईल वापरू नका, अशी सक्त ताकीद सोमवारी दिली होती. त्यानंतरही बहुतांश आमदार फोनमध्ये व्यस्त असल्याचे चित्र मंगळवारी सभागृहात पहायला मिळाले.

( हेही वाचा : वाहून जाणारे पाणी गोदावरी, तापी खोऱ्यात आणणार; मुंबईसह मराठवाड्याला होणार लाभ)

विधानपरिषद सभागृहात सोमवारी पंढरपूर कॉरीडोअरच्या संदर्भात लक्षवेधीवर चर्चा सुरू होती. या चर्चेत महादेव जानकर, अमोल मिटकरी, सचिन अहीर, मनीषा कायंदे, अनिकेत तटकरे यांनी सहभाग घेतला. ही चर्चा सुरू असताना काही सदस्य मोबाईलवर बोलत असल्याची बाब काही सदस्यांसह उप सभापती निलम गोऱ्हे यांच्याही लक्षात आली. त्याची दखल घेत त्यांनी सदस्यांना कडक शब्दांत समज दिली.

यासंदर्भात बोलताना निलम गोऱ्हे म्हणाल्या, या सभागृहातील सर्व सदस्य हुशार आणि समजदार आहेत. त्यामुळे चर्चा सुरू असताना त्यांनी मोबाईल फोनवर बोलू नये, अशी सामान्य अपेक्षा आहे. समज दिल्यावरही काही सदस्य समोर कागद धरून कागद वाचत असल्याचे भासवत मोबाईलवर बोलतात. पण हे आमच्या लक्षात येते आहे. कृपया असं करू नका, असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

पाहिले पाढे पंचावन्न

उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी झापल्यानंतरही मंगळवारी बहुतांश सदस्य मोबाईलचा वापर करताना दिसून आले. सभागृहात मोबाईलवर बोलावे किंवा नाही, याबाबत कोणतेही लिखित नियम नसले, तरी प्रथा-परंपरेनुसार आमदार सभागृहात मोबाईल वापरत नाहीत. मात्र, गेल्या काही वर्षांत बहुतांश तरुण आमदार चर्चेत भाग कमी, पण मोबाईलवर अधिक वेळ घालवताना दिसतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.