शिवसेना सोडून राष्ट्रवादीत गेल्यानंतर छगन भुजबळ यांनी एका प्रकरणात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा केला होता. यासंदर्भात न्यायालयातही खटला चालला. या दरम्यानच्या काळात सुभाष देसाई, संजय राऊतांनी मला भेटून एक चिठ्ठी दिली आणि मी खटला मागे घेतला, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी गुरुवारी केला.
छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त मुंबईत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शरद पवार, उद्धव ठाकरे, अजित पवार, फारूख अब्दुला यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले, रमाबाई नगरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाली. त्यावेळी आंदोलनादरम्यान गोळीबार झाला आणि ११ लहान-मोठी माणसे मारली गेली. तेव्हा मी विधानसभेत येऊन सांगितले की, हे सरकार खुनी आहे. यांनी लोकांचे खून केले.
दुसऱ्या दिवशी माझ्या घरावर हल्ला झाला. राजू जैन नामक व्यक्तीने तर, ‘मला छगन भुजबळ यांनी विटंबना कर म्हणून सांगितलं आणि मी नाही सांगितलं म्हणून त्यांनी दुसऱ्याकडून विटंबना करून घेतली’, असे प्रतिज्ञापत्र दिले. त्यानंतर सामनात, ‘हाच तो नराधम, यानेच विटंबना केली’, असे वृत्त प्रश्नचिन्हाशिवाय छापून आले. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंवर अब्रू नुकसानीचा खटला दाखल केला, असे भुजबळ यांनी सांगितले.
पाय धरण्याची तयारी दर्शवली
न्यायालयात खटला उभा राहिल्यानंतर संजय राऊत आणि सुभाष देसाई चिठ्ठी घेऊन माझ्याकडे आले. तेव्हा मी त्यांना विचारले, काय काम आहे? ते म्हणाले, बाळासाहेबांचे वय झाले आहे, आजारीही असतात. हे माझ्या लक्षात आल्यानंतर मी म्हटले थांबा, आता काहीच बोलू नका. त्यांनी केसची तारीख सांगितली. मी न्यायालयात गेलो. न्यायाधीशांना विनंती केली, मला केस मागे घ्यायची आहे. ते सुरूवातीला ऐकायला तयार नव्हते. शेवटी मी म्हणालो, तुमचे पाय धरतो, केस मागे घ्या. तेव्हा केस मागे घेण्यात आली, असा किस्सा भुजबळ यांनी सांगितला.
…तेव्हा उद्धव ठाकरे मागे उभे होते
केस मागे घेण्यात आली तेव्हा उद्धव ठाकरे तेथेच पाठीमागे होते. त्यांनी सांगितले बाळासाहेबांनी तुम्हाला चहाला बोलावले आहे. मी सांगितले नंतर येतो. आठ दिवसांनी बाळासाहेबांनी मला फोन केला आणि पूर्ण कुटुंबासोबत मातोश्रीवर यायला सांगितले,” असेही भुजबळांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community