कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती आल्याने अनेकांचे संसार उध्वस्त झाले. याचमुळे आता या भागात राजकीय नेत्यांचे पाहणी दौरे देखील सुरू झाले असून, राजकारण देखील रंगले आहे. मात्र राजकीय नेत्यांच्या या दौऱ्यांवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नाराजी व्यक्त करत, नेत्यांनी असे दौरे करणे टाळायला हवे, असे म्हटले होते. मात्र शरद पवारांच्या या आवाहनाला त्यांचे नातू आणि कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनीच छेद दिला आहे. रोहित पवार हे आज पूरस्थिती झालेल्या भागांची पाहणी करण्यासाठी गेले आहेत. त्याचमुळे आजोबांचे नातूही ऐकेना, अशी टीका आता राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे.
रोहित पवार आज चिपळूणमध्ये
कऱ्हाड, पाटण तालुक्यात निर्माण झालेली पूरस्थिती व भूस्खलन भागाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार रोहित पवार हे देखील आज दौऱ्यावर येत आहेत. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीचा फटका बसलेल्या नागरिकांना मदत करण्यासह त्यांचे दुःख हलकं करण्यासाठी रोहित पवार आज दौऱ्यावर येणार आहेत. चिपळूण तालुक्यातील पेढे ह्या गावात अतिवृष्टीमुळे काही घरांवर दरड कोसळून झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला व काही जण गंभीर जखमी आहेत. आज आमदार रोहित पवार यांनी पेढे ह्या गावी भेट देऊन पीडित कुटुंबाचे सांत्वन केले. यावेळी सोबत राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार शेखर निकम उपस्थित होते. तर रोहित पवार हे गुरुवारी कोल्हापूर व सांगलीचा दौरा करणार असून, गुरुवारी सायंकाळी ते वाई येथे भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन, नागरिकांशी संवाद साधणार आहेत.
(हेही वाचाः जे वेटिंगवर आहेत, ते वेटिंगवरच राहतील! राणेंच्या ‘त्या’ विधानाला पवारांचे चोख उत्तर)
काय म्हणाले होते शरद पवार?
नेत्यांच्या पाहणी दौ-यांवर शरद पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत टीका केली. पूरग्रस्त भागांची पहाणी करण्यासाठी अनेक नेते दौरे करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या भागांचा दौरा केला. पूरग्रस्त भागांतील परिस्थितीची माहिती घेण्यासाठी आणि लोकांना दिलासा देण्यासाठी त्यांना दौरे हे करावेच लागतात. पण इतर नेत्यांनी असे दौरे करुन गर्दी करू नये. तेथील लोकांना मदत करणे हे जास्त गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या दौ-यांमुळे तेथील व्यवस्थेवर ताण पडणार नाही याची काळजी इतर नेत्यांनी घ्यावी, असे शरद पवार म्हणाले होते.
(हेही वाचाः ‘हे’ झाले असते, तर राज्यात आलेल्या आपत्तीतून अनेक निष्पाप जीव वाचले असते)
Join Our WhatsApp Community