तरीही राज्यपाल निघाले मराठवाड्याच्या दौऱ्यावर!

राज्यपालांच्या मराठवाड्याच्या दौऱ्याच्या वेळी पालकमंत्री अशोक चव्हाण आणि नवाब मलिक उपस्थित राहणार नाहीत, अशी माहिती मिळत आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नुकतेच चिपळूण येथील पूरग्रस्तांना भेट देऊन त्यांचा व्यथा समजून घेतल्या, तेथील आढावा घेतला. त्याचे राज्य मंत्रिमंडळात ठरल्याप्रमाणे पडसाद उमटले. राज्यपालांनी दौरा करून राज्यात दोन सत्ताकेंद्रे निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, असा आक्षेप घेत मुख्य सचिवांच्या मार्फत मंत्रिमंडळाची नाराजीही राज्यपालांपर्यंत पोहचवली. मात्र असे असूनही राज्यपाल गुरुवारी, ५ ऑगस्ट रोजी नांदेडच्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर निघाले असून तेथील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या ते आढावा बैठकाही घेणार आहेत. त्यामुळे राज्यपालांनी एक प्रकारे राज्य मंत्रिमंडळाला ‘मला गृहीत धरू नका’, असा संदेश दिला आहे का, अशी चर्चा सुरु झाली आहे.

आक्षेपानंतरही दौरा रद्द नाहीच! 

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा मराठवाड्याचा तीन दिवसांचा दौरा हा पूर्वनियोजित असून बुधवारी मंत्रिमंडळाच्या आक्षेपानंतरही त्यांनी तो रद्द न करता ते दौऱ्यावर निघाले आहेत. या दौऱ्यात तिन्ही जिल्ह्यांमध्ये सरकारी अधिकाऱ्यांबरोबर बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे, मात्र तिन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री या वेळी उपस्थित राहणार नाहीत, अशी माहिती मिळत आहे. राज्यपाल तीन दिवस नांदेड, परभणी आणि हिंगोली या तीन जिल्ह्यांच्या दौऱ्यावर गेले आहेत. या तिन्ही जिल्ह्यांमध्ये शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत आढावा घेणार आहेत. यालाच मंत्रिमंडळाच्या बैठकीत आक्षेप घेण्यात आला. याबाबत मंत्रिमंडळाची नापसंती राज्यपालांना कळविण्यात आली. कोरोना, पूरपरिस्थितीचा आढावा राज्यपालांनी अधिकाऱ्यांच्या मार्फत घ्यायचा असतो, प्रत्यक्ष दौरा करायचा नसतो, राज्यपालांनी मंत्रिमंडळाच्या अधिकारात हस्तक्षेप करू नये, तसेच स्वतःला मुख्यमंत्री समजू नये, असे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक म्हणाले होते. मंत्रिमंडळाच्या आक्षेपानंतरही राज्यपालांचा दौरा पूर्वनियोजित कार्यक्रमानुसारच होईल, असे राजभवनच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

(हेही वाचा : राज्यपालांचे बोलावते धनी कोण? संजय राऊतांचा सवाल)

पालकमंत्री अधिक चव्हाण, नवाब मलिकांची पाठ!

राज्यपाल कोश्यारी यांच्या दौऱ्याच्या वेळी नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण व परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक हे उपस्थित राहणार नाहीत. गेल्या आठवड्यात राज्यपाल कोकण येथील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर गेले असता उदय सामंत व आदिती तटकरे हे अनुक्रमे रत्नागिरी आणि रायगडचे पालकमंत्री उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here