राज्यभरात धार्मिक स्थळांवरील भोंग्यावरून उदभवलेल्या वादामुळे अनेक ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले. याच पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या कारणास्तव व कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाणे आयुक्तालय क्षेत्रात असणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरु केली. बुधवारी सायंकाळी उशिरा ठाणे न्यायालयाने ठाण्यातील विविध ठिकाणावरून ताब्यात घेतलेल्या बारा पदाधिकाऱ्यांना अटी शर्तीसह जामीन मंजूर केला.
(हेही वाचा – राज ठाकरेंच्या ‘वसंता’ने अखेर सोडलं मौन; म्हणाले, “साहेबांच्या आदेशानंतर…” )
ठाण्यात पडसाद उमटण्याची शक्यता
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंग्याबाबत दिलेल्या आदेशानंतर त्याचे ठाण्यात पडसाद उमटण्याची शक्यता ओळखून आज पहाटेच चितळसर – मानपाडा, कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मनसे पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यास सुरवात केली. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यासोबतच मनसेचे संदीप चव्हाण, मयुर तळेकर, लहू दळवी, संदीप गोंदुकुपे, अशोक यादव, संजय यादव, सौरभ नाईक, नीलेश चौधरी, विवेक घार्गे, सागर भोसले, आशिष उमासरे या पदाधिकाऱ्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
सायंकाळी या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ठाणे सत्र न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायामूर्ती डी. डी. कोलपकर यांनी अटी शर्तीसह संदीप पाचंगे व बारा पदाधिकाऱ्यांना जामीन मंजूर केला. अँड. ओंकार राजूरकर यांनी मनसे पदाधिकाऱ्यांच्या वतीने न्यायालयात बाजू मांडली. पुढील १३ दिवस पोलीस ठाण्यात दररोज या पदाधिकाऱ्यांना पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार असून न्यायालयाच्या अटींचा भंग केल्यास १५ हजारांचा दंड ठोठावला जाणार असल्याची माहिती निकालानंतर अँड. ओंकार राजूरकर यांनी दिली.
आदेशाचे पालन होणारच
कायद्याच्या चौकटीत राहून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाचे पालन केले जाईल. हिंदुत्वाच्या रक्षणार्थ आणखी केसेस अंगावर घेणारच. मात्र हा लढा थांबू देणार नाही, अशी प्रतिक्रिया संदीप पाचंगे यांनी निकालानंतर पत्रकारांशी बोलताना दिली.
Join Our WhatsApp Community