मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला तिजोरीची चावी दिली आहे त्यामुळे आता पैशांची कमतरता पडू देणार नाही. बंजारा समाजासाठी ५९३ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला असून आता मी तुम्हाला शब्द देतो की, कोणतेही काम मी थांबू देणार नाही असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंजारा समाजाला दिले आहे. तसेच विविध घोषणाही केल्या आहेत. पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्रीही उपस्थित होते.
( हेही वाचा : देशाच्या प्रगतीचा महामार्ग! दिल्ली ते मुंबई सुसाट प्रवास, द्रुतगती मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण)
५९३ कोटी रुपयांचा आराखडा
बंजारा समाजासाठी पैशांची कमतरचा पडू देणार नाही. ५९३ कोटींचा आराखडा तयार केला आहे असे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. सेवालाल महाराज लढवय्ये होते, समाजावर आक्रमण झाले तेव्हा त्यांनी लढायला शिकवले तसेच त्यांनी प्रसंगी शांतीचाही संदेश दिला. त्यांनी बावीस प्रतिज्ञा समाजाला दिल्या त्या प्रतिज्ञांचा अंगीकार आपण केला पाहिजे असेही ते म्हणाले.
फडणवीसांनी केल्या महत्त्वाच्या घोषणा
- बंजारा समाजाला शिक्षणात वंचित राहण्याची वेळ येऊ नये. मुलामुलींना शिक्षण घेता आले पाहीजे यासाठी त्यांच्या राहण्याची सोय केली जाणार हे मोठे परिवर्तन येत्या काळात घडणार आहे.
- नॉन क्रिमिलेअरची अट जर कायद्यात बसत असेल तर त्यावर निर्णय घेतला जाईल. कारण घोषणा करू आणि पूर्ण होणार नाही असे नको, त्यामुळे याप्रकरणी महाधिवक्ता यांचे मत याबाबत घेऊन मग हे काम केले जाईल.
- वर्धा – नांदेड लोहमार्ग पोहरागड येथून न्यावा या मागणीप्रमाणे लवकरच पोहरागडमध्ये रेल्वेलाईन येणार आहे. यासाठी फडणवीसांनी पंतप्रधानांना विनंती केली होती.
- पोहरागडवरून काशीला येणाऱ्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागणार नाही. बंजारा समाजाचा महामंडळामार्फत विकास केला जाणार असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.