मुंबईच्या सर्वांगीण विकासाच्या अंतर्गत मुंबईतील सर्व रस्ते सिमेंट कॉंक्रिटचे बनवण्यात येणार आहेत. त्यामुळे पुढील ४० वर्षे तरी रस्त्याची समस्या राहणार नाही. मात्र यामुळे महापालिकेतील दुकानदारी बंद होणार आहे, त्यांचे दुःख सध्या लोकांना होत आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार आदित्य ठाकरे यांना टोला हाणला.
रस्त्याच्या कामावरून भ्रष्टाचार
मुंबईतील रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणासाठीच्या कंत्राटावरून ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली होती. त्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ज्यांची हयात घोटाळे करण्यात झाली. त्यांना दु:ख होत आहे. काँक्रिटचे रस्ते केले तर 40 वर्षे रस्तेच होणार नाही. त्यामुळे यांची दुकानदारी बंद होईल. यांची दुकानदारी बंद करण्याचे काम हे काँक्रिटचे रस्ते करत आहेत. त्यामुळे त्यांची ओरड सुरू आहे. आपण मुख्यमंत्री असताना महापालिकेच्या रस्त्यांची चौकशी झाली होती. त्यावेळी 200 रस्त्यांच्या खालील लेअरच गायब होती. ते आम्हाला रस्त्यांच्या मुद्द्यावरून बोलत आहेत. त्यांचा भ्रष्टाचार उखडून टाकण्याचे काम सध्याचे मुख्यमंत्री करत आहेत, असेही फडणवीस म्हणाले.
(हेही वाचा मुंबईत कुठे कुठे आहेत जोशीमठ?)
पंतप्रधानांच्या सभेला दीड लाखांची होणार गर्दी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवार, १९ जानेवारी रोजी बीकेसी मैदानावर जाहीर सभा होणार आहे. या सभेची भाजप आणि शिंदे गटाने जय्यत तयारी केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीकेसीवर जाऊन कार्यक्रम स्थळाची पाहणी केली. तसेच सुरक्षेचाही आढावा घेतला. लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त जनसागर बीकेसी मैदानावर येईल अशी शक्यता आहे. येणाऱ्या नागरिकांची अव्यवस्था होणार नाही याची काळजी घेत आहोत. या संदर्भात पोलिसांशी चर्चा केली, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.