महाराष्ट्राला बदनाम करण्याचे विरोधकांचे षडयंत्र – देवेंद्र फडणवीसांचा आरोप

141

टाटा एअर बस, सॅफ्रोन दोन्ही प्रकल्प ठाकरे सरकारच्या कार्यकाळात वर्ष २०२१ मध्येच महाराष्ट्राच्या बाहेर गेले होते, त्याला ठाकरे सरकारची निष्क्रियता कारणीभूत आहे. त्यांच्या अपयशाचे खापर आमच्या सरकारवर का फोडले जात आहे? विरोधक जाणीवपूर्वक राज्यात नकारात्मक वातावरण निर्माण करत आहेत. गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून राज्याला बदनाम करण्याचे षडयंत्र विरोधकांनी रचले आहे, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केला.

अडीच वर्षे मोदींना शिव्या घालण्यात घालवले

टाटा एअर बस गुजरातला जाणार होता, याची आधीच कल्पना होती, हा प्रकल्प २०२१ मध्येच महाराष्ट्रातून गुजरातला गेला होता, आता त्यावर विरोधक आकांडतांडव करत आहेत. त्यावेळी आपण स्वतः कंपनीच्या लोकांशी चर्चा केली, तेव्हा त्यांनी महाराष्ट्रात चांगले वातावरण नाही, असे सांगितले होते. सॅफ्रोन हा प्रकल्पही २०२१ मध्ये महाराष्ट्राच्या बाहेर गेला होता. हे दोन्ही प्रकल्प मविआ सरकारच्या काळात गेले आहेत, असे फडणवीस म्हणाले. आमच्या सरकारच्या काळात ऑगस्ट-सप्टेंबर २०१९ मध्ये मी स्वतः सॅफ्रोन कंपनी सोबत चर्चा केली होती. त्यानंतर आमचे सरकार गेले, पुढे मविआ सरकारने १ वर्षे कंपनीशी पत्रव्यवहार केला नाही. ठाकरे सरकारने संपर्कही केला नव्हता. त्यावर २०२१ मध्ये या कंपनीने गुजरातमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. अडीच वर्षे या सरकारने केवळ मोदींना शिव्या घालण्यात घालवले. मेडिकल डिवाईस पार्क आणि बल्क ड्रफ पार्क हे दोन्ही प्रकल्प महाराष्ट्राला देण्याची घोषणा केंद्राने केलीच नव्हती, त्यामुळे ते महाराष्ट्रातून गेले असे म्हणण्याला अर्थ नाही, असेही फडणवीस म्हणाले.

(हेही वाचा बच्चू कडू नक्की कुणाचे समर्थक आमदार? फडणवीसांनी केला खुलासा )

राज्यात नकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न

नाणार रिफायनरी प्रकल्प आम्ही करणारच, तो प्रकल्प रद्द केल्याची आम्ही घोषणा केली नाही. खोटी वक्तव्ये करून राज्यात नकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. इतर राज्यात जाणारे प्रकल्प महाराष्ट्रात येण्यासाठी आपले शेवटपर्यंत प्रयत्न असतील, असे सांगत पंतप्रधान मोदी यांचे सरकार आल्यापासून आतापर्यंत महाराष्ट्राला सर्वाधिक निधी मिळाला आहे, असेही फडणवीस म्हणाले. विरोधकांनी केलेल्या आरोपाचे आपण कागदोपत्री पुरावे देऊन ते कसे खोटे आहेत, हे सिद्ध केले आहे. त्यांच्या जिभेलाही हाड राहिले नाही. त्यांच्याकडे एकही कागद नाही. अडीच वर्षे सरकार चालवले, एक कर्तृत्व दाखवून द्यावे, महाराष्ट्राची बदनामी करण्याचे त्यांनी षडयंत्र रचले आहे. सत्ता गेल्यामुळे त्यांच्यावर विपरीत परिणाम झाला आहे. जेवढी बदनामी ते करतील, तेवढे मी त्यांना उघडे पाडेन, असेही फडणवीस म्हणाले.

(हेही वाचा २ वर्षांत महाराष्ट्राला गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर आणणार! – देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.