महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत सरकारमधून मोकळे करण्याची पक्षाला विनंती करणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) गुरुवारी नागपूरमार्गे दिल्लीत दाखल झाले. दिल्लीत त्यांनी रात्री उशिरा भाजपचे नेते अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत भाजपला महाराष्ट्रात आलेल्या दारुण अपयशाच्या कारणांवर चर्चा झाल्याचे समजते.
भाजपने लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना तसेच अन्य छोटे मोठे पक्ष सोबत घेऊन महायुतीने महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचा निर्धार केला होता. तसा माहोल युतीच्या नेत्यांनी तयार केला होता.
परंतु, लोकसभा निकालात महाविकास आघाडीने महायुतीला धोबीपछाड दिला. महायुतीला १७ तर महाविकास आघाडीला ३० जागा मिळाल्या. एका जागेवर काँग्रेसचा बंडखोर उमेदवार निवडून आला. भाजप २३ जागांवरून ९ जागांवर आला. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक तोंडावर असताना लोकसभा निवडणुकीचे निकाल महायुती विशेषतः भाजपसाठी धक्कादायक आहेत.
या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्यांची बैठक काल, भाजपच्या प्रदेश कार्यालयात पार पडली. या बैठकीत लोकसभा निवडणूक निकालांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. आगामी विधानसभा निवडणुकीत पक्ष संघटनेत काम करता यावे म्हणून पक्षाने आपल्याला सरकारमधून मोकळे करावे, अशी विनंती त्यांनी पक्षाला केली आहे.
या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी नागपूरमार्गे दिल्ली गाठली. नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थानिक नेत्यांनी सुरुवातीला फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर फडणवीस दिल्लीत दाखल झाले. दिल्लीत त्यांनी रात्री उशिरा पक्षाचे नेते अमित शहा यांची भेट घेऊन चर्चा केली.