संजय राऊत असो किंवा अन्य कुणीही असो ज्यांना असुरक्षित वाटत असेल, तर त्यात तथ्य आहे कि नाही याचा तपास यासाठी नियुक्त केलेली समिती करते. कुणालाही सुरक्षा द्यायची कि नाही, याचा निर्णय मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री करत नाही. त्यांचे पत्र त्या समितीकडे जाईल आणि त्यांना आवश्यक सुरक्षा पुरवली जाईल. त्यांना अलीकडे प्रसिद्धीची सवय लागली आहे, एक पुरावा त्यांच्याजवळ नाही, आता २ हजार कोटींचा आरोप केला आहे. बिनडोक आरोप करतात, त्यावर काय उत्तरही द्यायचे आम्ही टाळत असतो, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
खोटे बोलून सहानुभूती मिळत नाही
संजय राऊत हे सनसनाटी निर्माण करण्यासाठी आरोप करत आहेत. सुरक्षेचा विषय राजकारणाशी जोडणे चूक आहे, कोणत्याही पुराव्याशिवाय असे आरोप करणे हे तर त्याहून अधिक चूक आहे. संजय राऊत यांना रोज खोटे बोलायची सवय लागली आहे. खोटे बोलून सहानुभूती मिळत नाही, चुकीचे आरोप लावल्यामुळे उद्या त्यांच्यावरच कारवाई करण्याची कुणी मागणी करेल, किंबहुना तसे सुरूही झाले आहे. आसाममधील ज्योतिर्लिंगसंबंधीची जी जाहिरात प्रसिद्ध झाली, त्याने जेवढी प्रसिद्धी झाली नाही, त्याहुन अधिक चर्चा यांच्या बोलण्यामुळे झाली आहे. हे जे सगळे बोलतात, ते महाराष्ट्राची बदनामी करत आहेत, भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातच आहे, कुणाच्याही मनात शंका नाही. उद्या जर मी जाहिरात केली की आसामचे कामाख्या मंदिर महाराष्ट्रात आहे, ते महाराष्ट्रात येणार आहे का?, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Join Our WhatsApp Community