सध्या राज्यात सत्तांतर झाले आहे, शिंदे-फडणवीस यांचे सरकार सुरळीत सुरु झाले असतानाच आगामी काळात कधीही महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्यानंतर विधानसभा, लोकसभा निवडणुकांची लगबग सुरु होणार आहे. त्यामुळे भाजपाने आधीच शिंदे गटाच्या माध्यमातून शिवसेना हायजॅक केली आहे, आता मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह नाशिकमध्ये प्राबल्य असलेल्या मनसेचे साहाय्य घेण्याची रणनीती भाजपने आखली आहे, त्यासाठी भाजपच्या नेत्यांची राज ठाकरे यांच्या निवासस्थानी येणे-जाणे वाढल्याचे दिसत आहे.
मनसेसोबत युती करण्याचा प्रयत्न
राज्यात सध्या शिवसेनेत हिंदुत्वाच्या मुद्यावरून उभी फूट पडली आहे. त्यामुल्ले हिंदुत्वाची निर्माण झालेली पोकळी राज ठाकरे भरून काढण्यासाठी सिद्ध झाले आहेत, त्यासाठी त्यांनी मनसैनिकांनी ओळख हिंदुरक्षक अशी ओळख निर्माण केली आहे. भाजपा आता याच मुळे मनसेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी मागील महिनाभरात भाजपच्या ३ ज्येष्ठ नेत्यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहेत. सर्वात आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती, त्यानंतर भाजपचे आणखी एक नेते विनोद तावडे यांनीही भेट घेतली, आता बुधवारी, ३१ ऑगस्ट रोजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
अमित शहांच्या मुंबई दौऱ्यात होणार चर्चा
यंदाच्या गणेशोत्सवात लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येणारे आहेत. त्याआधीच मनसेसोबत सलगी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असे सूत्रांकडून समजते. अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यात मनसेसोबतच्या युतीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community