विधिमंडळाच्या आवारात कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रतिमेला सत्ताधारी आमदारांकडून जोडे मारण्याचा प्रकार झाला ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. ही महाराष्ट्राची परंपरा नाही असे सांगतानाच रस्त्यावर लोक जे काही करतात तो ज्याचा-त्याचा प्रश्न असतो, परंतु विधीमंडळ कार्यक्षेत्रात असा प्रकार घडता कामा नये अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी करत सत्ताधारांच्या जोडे मारो आंदोलनावर आक्षेप नोंदवला. पवारांच्या या आक्षेपावर उत्तर देताना विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
फडणवीस काय म्हणाले?
अजित पवारांच्या आक्षेपावर बोलताना फडणवीस म्हणाले की, ‘विरोधी पक्ष नेत्यांनी जे सांगितलं आहे, ते योग्य आहे. विधिमंडळाच्या आवारात अशाप्रकारे जोडे मारो करू नये याबाबत मी सहमत आहे. दोन्ही बाजूच्या सगळ्या सदस्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. विधिमंडळाच्या आवारात अशाप्रकारचे जोडे मारो आंदोलन हे यापुढे होऊ नये अशी काळजी घ्यावी लागेल. फक्त त्याचवेळी या देशाचे सुपुत्र आणि याठिकाणी खऱ्या अर्थाने क्रांतिकारकाचे स्फूर्तीस्थान असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल ज्या हीन प्रवृत्तीने याठिकाणी बोललं जात, ते बोलणं देखील पहिल्यांदा बंद झालं पाहिजे. कारण वीर सावरकरांनी जे भोगलंय ते कोणीच भोगलेलं नाही.’
हे भगत सिंगांपेक्षा मोठे आहेत का?
पुढे फडणवीस म्हणाले की, ‘११ वर्ष कोलूचा बैल म्हणून त्याठिकाणी वीर सावरकर अंदमानच्या कारागृहामध्ये अत्याचार सहन करत होते. तरी वंदे मातरम म्हणत होते, भारत माता की जय म्हणत होते. अनेक लोकं त्याठिकाणी मृत्यूमुखी पडले, अनेक लोकं वेडी झाली. पण वीर सावरकरांनी त्याठिकाणी अत्याचार सहन करत, संघर्ष केला. म्हणून भगत सिंग यांनी देखील वीर सावरकरांनी छापलेले जे आत्मचत्रित होते, त्याचे मासिक तयार करून वाटण्याचं काम हे स्वतः भगत सिंगांनी केलेलं आहे. हे इतिहासात नमूद आहे आणि आता हे कोण आले, हे भगत सिंगांपेक्षा मोठे आहेत का? जे याठिकाणी सावरकरांवर बोलतात. हे अतिशय चुकीचं असून त्याचा निषेध झाला पाहिजे. वीर सावरकरांच्या विरोधात बोलणाऱ्यांचा निषेध झालाच पाहिजे आणि म्हणून याठिकाणी निषेध आम्ही करतो.’
ही हीन प्रवृत्ती त्यांनी बंद केली पाहिजे
सत्तारुढ पक्षाच्या वतीने मी आश्वासन देतो की, ‘अशाप्रकारे सभागृहाच्या आवारामध्ये कुठल्याही नेत्याला जोडे मारो आंदोलन वगैरे हे केलं जाणार नाही. हे योग्य नाही. याकरता सभागृहाचं आवार नाही. तसंच समोरच्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे, या देशाच्या स्वातंत्र्यवीरांच्या विरोधात अशाप्रकारे त्यांनी बोलणं चुकीचं आहे. ही हीन प्रवृत्ती त्यांनी बंद केली पाहिजे. ही माझी विनंती आहे आणि अध्यक्ष महोदय, या सभागृहात दोन्हीकडून जे बोललं असेल, त्यात जे चुकीचं असेल ते आपण तपासून घ्यावं, चुकीच असेल तर काढून टाकावं आणि आता याठिकाणी सभागृहाचं कामकाज सुरू करावं, अशी माझी आपल्याला विनंती आहे, अशा प्रकारे फडणवीसांनी भूमिका मांडली.’
(हेही वाचा – वीर सावरकरांचा अवमान: राहुल गांधींच्या फोटोला भाजपच्या आमदारांनी विधिमंडळ परिसरात मारले जोडे)
Join Our WhatsApp Community