‘अक्कल नसलेल्या मूर्खांना मी उत्तर देत नाही’, फडणवीसांचे काँग्रेसला प्रत्युत्तर

214

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजेच पीएफआय या दहशतवादी कृत्यांशी संबंधित असलेल्या संघटनेवर अखेर केंद्र सरकारकडून बंदी घालण्यात आली आहे. या बंदीमुळे केंद्र सरकारच्या या निर्णयाचे देशभरातून स्वागत होत असतानाच, काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याची मागणी करायला सुरुवात केली आहे. त्याला आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.

काँग्रेस खासदार आणि लालूंची मागणी

एनआयए आणि राज्य एटीएसकडून गेल्या काही दिवसांपासून पीएफआयशी संबंधित ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली. यावेळी तपास यंत्रणांना पीएफआयकडून देशविघातक कृत्यांबाबत पुरावे आढळून आले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने बुधवारी पीएफआयवर बंदी घातली आहे. या निर्णयानंतर काँग्रेसचे केरळमधील लोकसभा खासदार आणि प्रतोद के सुरेश यांनी तसेच राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याची मागणी केली. त्यावरुन फडणवीस यांनी निशाणा साधला आहे.

अक्कल नसलेल्यांना उत्तर देत नाही

असे मूर्खासारखे बोलणार अनेक लोक देशात आहेत. या देशामध्ये कायदा आणि संविधान आहे. त्यामुळे अशाप्रकारची मागणी करताना सबळ पुरावे लागतात. देशातील एकातरी राज्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अशाप्रकारच्या कृत्यांत सहभाग असल्याचा पुरावा त्यांच्याकडे आहे का? उलट केरळमधील याआधीच्या काँग्रेस आणि कम्युनिस्ट सरकारांनी देखील पीएफआयवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यामुळे असं मूर्खासारखं बोलणा-या आणि अक्कल नसणा-या लोकांना मी उत्तर देत नाही, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका केली.

केंद्र सरकारने पीएफआयवर घातलेल्या या बंदीच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. त्यामुळे राज्यांना याबाबत आता कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्रात पीएफआय आणि त्याच्याशी संबंधित सहा संघटनांवर कारवाई करण्याचे काम लवकरच करण्यात येईल, असे देखील फडणवीसांनी स्पष्ट केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.