देवेंद्र फडणवीसांचा दणका; जलसंपदा विभागातील ‘त्या’ कंत्राटी अधिकाऱ्याची नियुक्ती रद्द

महाविकास आघाडी सरकारच्या अनेक निर्णयांना ब्रेक लावल्यानंतर, आता तत्कालीन मंत्र्यांनी मंत्रालयात पेरून ठेवलेल्या माणसांना घरचा रस्ता दाखविण्याची मोहिम शिंदे-फडणवीसांनी हाती घेतली आहे. त्याची सुरुवात जलसंपदा विभागापासून करण्यात आली असून, तत्कालीन मंत्र्याचे सर्व व्यवहार सांभाळणाऱ्या एका कंत्राटी अधिकाऱ्याची नियुक्ती रद्द तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात आली आहे.

( हेही वाचा : गडचिरोलीतील पोलिसांच्या वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत काढणार; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा )

मुदतवाढ तात्काळ रद्द करण्याचा निर्णय

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जलसंपदा मंत्री असताना निवृत्त आयएएस अधिकारी विजयकुमार गौतम यांची विशेष कार्य अधिकारी या पदावर कंत्राटी नियुक्ती करण्यात आली होती. महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात जलसंपदा विभागामध्ये गौतम यांची इतकी चलती होती, की एखादा शासन निर्णय निर्गमीत करायचा झाला तरी त्यांची परवानगी घ्यावी लागायची. शिवाय लहान-मोठ्या फाईल्सही त्यांच्या नजरेखालून गेल्याशिवाय मंत्र्यांसमोर ठेवल्या जात नसत, असे जलसंपदा विभागातील अधिकारी खासगीत सांगतात. महाविकास आघाडी सरकार पायऊतार होण्याच्या काही दिवस आधी त्यांना अधिकृत शासन निर्णयाद्वारे एका वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती.

परंतु, गौतम यांच्या कारभाराचा महिमा देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर पडताच त्यांनी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून शाहनिशा करून घेतली. त्यानंतरच विजयकुमार गौतम यांची विशेष कार्य अधिकारी या पदावर कंत्राटी तत्त्वावर केलेली नेमणूक, तसेच एक वर्षाच्या कालावधीसाठी दिलेली मुदतवाढ तात्काळ प्रभावाने रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी काढण्यात आलेल्या शासन निर्णयावर ‘प्रशासकीय कारणास्तव’ असा शेरा मारण्यात आला असला, तरी गौतम यांची पार्श्वभूमीच त्यास कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here