‘मी आलो आणि यांना घेऊन आलो’, फडणवीसांचा मविआला टोला

79

सोमवारी विधान भवनात शिंदे-भाजप युतीने बहुमताचा ठराव जिंकत आपल्या सरकारवर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे शिंदे-भाजप सरकारचे कौतुक होत असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे. मी पुन्हा येईन वरुन माझी टिंगल करण्यात आली. पण मी आलो आणि शिंदेंना सोबत घेऊन आलो, अशा शब्दांत फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

मी आलो पण…

ज्यावेळी महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं होतं त्यावेळीच ही आघाडी अनैसर्गिक असल्याचे मी म्हटले होते. त्यामुळे हे सरकार टिकणार नसल्याचेही मी सांगितले होते. पण त्यावेळी माझी खूप टिंगलटवाळी करण्यात आली. ‘मी पुन्हा येईन’ ही कविता मी म्हटली होती. त्यावरुन अनेकांनी माझी टिंगल केली. पण मी आलो आणि एकटा नाही एकनाथ शिंदे यांनाही सोबत घेऊन आलो, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

(हेही वाचाः ‘एकनाथ शिंदे कट्टर शिवसैनिक’, फडणवीसांकडून शिंदेंचं कौतुक)

हर एक का मौका आता हैं

ज्यांनी माझी टिंगलटवाळी केली, ज्यांनी अपमान केला त्यांचा मी बदला घेणार आणि माझा बदला इतकाच आहे की मी त्यांना माफ केलं आहे. राजकारणात या गोष्टी मनावर घ्यायच्या नसतात. हर एक का मौका आता हैं, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

सत्ता साध्य नाही, तर साधन

काही लोकांना आम्ही सत्तेसाठी झगडत असल्याचे वाटत होते. आमच्याकडे बहुमत असताना सुद्धा आम्हाला विरोधी बाकांवर बसावे लागले, पण त्यामुळे आम्ही कधीही विचलित झालो नाही. कारण सत्ता हे आमचं साध्य नाही तर साधन आहे. सामान्य माणसाच्या जीवनात सामाजिक आणि आर्थिक बदल घडवून आणण्यासाठी आम्हाला सत्ता हवी आहे.

(हेही वाचाः शिंदे-भाजप सरकारवर शिक्कामोर्तब, जिंकला विश्वासदर्शक ठराव)

मोदींनी केला जनतेच्या बहुमताचा आदर

त्यामुळेच आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्ता आम्हाला महत्वाची नाही हे दाखवून दिलं आहे. जनतेने आम्हाला बहुमताने विजयी करुन सुद्धा ते बहुमत आमच्याकडून हिरावून घेण्यात आलं. म्हणून मोदींनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या सच्च्या कार्यकर्त्याला मुख्यमंत्री करुन, जनतेच्या बहुमताचा आदर केला. त्यामुळेच त्यांनी मला उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिल्यावर मी ती स्विकारली.

जेव्हा-जेव्हा धनानंदाची सत्ता निरंकुश होते, तेव्हा-तेव्हा कुठल्यातरी चाणक्याला चंद्रगुप्त शोधावा लागतो आणि ती निरंकुश खाली आणावी लागते. तसेच आता घडताना दिसत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.