सावरकरांचा अवमान करणाऱ्यांना जमिनीत गाडणार; देवेंद्र फडणवीस यांचा इशारा

147

स्वातंत्र्यवीर सावरकर हे एकमेव असे व्यक्तिमत्त्व होते, ज्यांनी स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतरही कारावास भोगला. परंतु, कॉंग्रेसने जाणिवपूर्वक त्यांच्या विचारांची अवहेलना केली. ती आजतागायत सुरू आहे. यापुढे सावरकरांचा अवमान करणाऱ्यांना जमिनीत गाडल्याशिवाय राहणार नाही, असा स्पष्ट इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या वतीने विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात बुधवारी पार पडलेल्या या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. अंदमानच्या तुरुंगात काळ्या पाण्याची दुहेरी शिक्षा भोगत असताना सावरकरांनी ११ वर्षे जे अनन्वित अत्याचार सहन केले, तशी शिक्षा भोगणारे एक तरी काँग्रेस नेते दाखवा, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. सावरकर अंदमानच्या कोठडीत गेले नसते, तर शेकडो कैद्यांनी आत्महत्या केल्या असत्या. त्यांना धीर देण्याचे काम त्यांनी केले, असेही फडणवीस यांनी सांगितले.

राहुल गांधी यांना सावरकरांमधला ‘स’ ही माहित नाही. तरीही त्यांच्याविषयी गरळ ओकण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे. त्यांना आम्ही योग्य उत्तर देऊ. जोपर्यंत हिंदू एक होता, तोवर एकाही आक्रमकाची हल्ला करण्याची हिम्मत झाली नव्हती. पण हिंदू मधली एकता दुबळी झाली, तेव्हा आपला देश पारतंत्र्यात गेला. त्यामुळे हिंदू समाजाला एकत्र करण्याचे काम सावरकरांनी केले. मला फक्त मार्सेलिसच्या उडीपर्यंत मर्यादित ठेवू नका, मी जातीव्यवस्थेच्या उच्चाटनासाठी केलेले कार्य अखंड सुरू ठेवा, असे ते सांगायचे. त्यांनी नेहमीच विज्ञानाची उपासना केली. हिंदू समाजातील अवैज्ञानिक रूढींना त्यांनी विरोध केला. बाळासाहेबांनीही कर्मकांडाला थारा दिला नाही. त्यामुळे सावरकरांच्या हिंदुत्वाचा धागा बाळासाहेबांनी पुढे नेला, असे फडणवीस म्हणाले.

उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा विसर पडला

स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी बाळासाहेबांना जाज्जवल्य अभिमान होता. पण उद्धव ठाकरेंना सावरकरांचा विसर पडला. राहुल गांधी यांनी सावरकरांविषयी अत्यंत अवमानकारक वक्तव्य केल्यानंतरही आदित्य ठाकरे त्यांच्या गळ्यात गळे घालतात, त्यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होतात. तिकडे स्वर्गात बाळासाहेबांना याविषयी काय वाटत असेल, याचा तरी विचार करा. तुम्हाला बाळासाहेबांशी नाते सांगण्याचा अधिकार उरलेला नाही. त्यामुळेच बाळासाहेबांचा वारसा चालवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे, अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.