जेव्हापासून राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली, तेव्हापासून मनसे (MNS) महायुतीमध्ये सहभागी होईल, अशी चर्चा सुरु झाली आहे. मात्र अद्याप त्याविषयी ना राज ठाकरे यांच्याकडून सुस्पष्टता आली नाही ना भाजपाकडून. अशातच राज ठाकरे यांनी आपण गुढी पाडव्याच्या मेळाव्यात भूमिका मांडणार आहोत, असे सांगितल्याने मंगळवार, ९ एप्रिल रोजी शिवतीर्थ येथे मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या महायुतीमध्ये सहभागी होण्याविषयी भाष्य केले आहे.
(हेही वाचा Lok Sabha Elections 2024: निवडणुकीनिमित्त मोदींच्या राज्यभरात १० सभा, पहिली सभा सोमवारी चंद्रपूरमध्ये)
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा अजेंडा घेतल्याने जवळीक वाढली. मोदींना पंतप्रधान करण्याची भूमिका राज ठाकरेंनी घेतली होती. राज ठाकरेंनी मोदींना पाठींबा द्यावा ही अपेक्षा आहे. मनसेसोबत (MNS) गेल्या काही काळात चर्चा झाली आहे. मनसेने हिंदुत्वाचा अजेंड्या घेतल्यावर त्यांची आणि आमची जवळीक वाढली आहे. राज ठाकरे यांनी 2014 मध्ये मोदींजींना समर्थन दिले होते. मोदीजी पंतप्रधान व्हावे,अशी राज ठाकरेंची इच्छा होती, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. मनसे (MNS) हा राज ठाकरेंचा पक्ष आहे, त्यासाठी त्यांना विचार करावा लागेल. पण, राज ठाकरेंना देखील आज हे मान्य असेल की, पंतप्रधान मोदींनी गेल्या 10 वर्षात जो विकास केला आहे आणि नवीन भारताची निर्मिती झाली आहे. अशा परिस्थिती सर्व लोकांनी मोदींच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे. ज्यांच्यासाठी समाज आणि राष्ट्र प्रथम आहे, अशा विचाराने प्रेरित सर्व लोकांनी मोदींसोबत राहायला हवं. मला विश्वास आहे की, राज ठाकरे आणि मनसे (MNS) पंतप्रधान मोदींना पाठिंबा देतील, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Join Our WhatsApp Community