आळंदी येथे कोणताही लाठीचार्ज झालेला नाही, त्यामुळे न घडलेल्या घटनेचे राजकारण करू नका. आपल्यासाठी वारकऱ्यांची सुरक्षा सर्वाधिक महत्वाची आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात गेल्यावर्षी चेंगराचेंगरी होऊन काही महिला जखमी झाल्या होत्या, तशी स्थिती निर्माण होऊ नये, याला पोलिसांचे प्रथम प्राध्यान्य होते, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नागपूर येथे सांगितले.
(हेही वाचा – Barsu Refinery : रिफायनरी बारसूऐवजी सिंधुदुर्गमध्ये? तिसऱ्या पर्यायाची चाचपणी; दोडामार्गमध्ये १ हजार ८०० एकर जागा उपलब्ध)
आळंदी येथील घटनेसंदर्भात ते माध्यमांशी बोलत होते. फडणवीस म्हणाले की, गेल्यावर्षी चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती आणि त्यावेळी काही महिला सुद्धा जखमी झाल्या होत्या. त्यामुळे यावर्षी प्रधान जिल्हा न्यायाधीश, धर्मादाय आयुक्त, मंदिर प्रमुख विश्वस्त ढगे पाटील आणि सर्व मानाच्या दिंडीचे प्रमुख यांची एक बैठक झाली आणि गेल्यावर्षीसारखी स्थिती निर्माण होऊ नये म्हणून सर्वानुमते निर्णय घेण्यात आला की प्रत्येक मानाच्या दिंडीला ७५ पासेस देण्यात याव्यात. त्यानुसार संपूर्ण नियोजन करण्यात आले. मात्र काही स्थानिक तरुणांनी मध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे थोडी झटापट झाली. आता परिस्थिती संपूर्णपणे शांत असून पोलिस स्थानिकांशी चर्चा करीत आहेत. आम्ही सुद्धा गांभीर्याने याची दखल घेतली आहे. काही माध्यमांनी याचे वृत्तांकन करताना फार मोठा लाठीमार अशा बातम्या दिल्या, माझी माध्यमांना विनंती आहे की जे झाले नाही, त्यातून जनतेत क्षोभ निर्माण होईल, असे काही करू नका. गेल्यावर्षी चेंगराचेंगरी झाली, त्या घटनेचे आम्ही राजकारण केले नाही, माझे राजकीय पक्षांना सुद्धा आवाहन आहे की त्यांनी वस्तुस्थिती समजावून घ्यावी. वारकऱ्यांची सुरक्षा आमच्यासाठी सर्वात महत्वाची आहे. अशाही स्थितीत त्यांना राजकारण करायचे असेल तर त्यांच्या बुद्धीची कीव करावी लागेल, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community