वैधानिक मुल्यांची जपणूक करुन देशाला पुढे नेवू – देवेंद्र फडणवीस

141

भारतदेशाला दिशा देणाऱ्या संवैधानिक मुल्यांची जपणूक करत महाराष्ट्राला आणि देशाला पुढे घेवून जावूया, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. अमृतकालात सुरू असलेल्या महाराष्ट्राच्या विकास यात्रेत सर्व सामान्यांना सहभागी करून पुढे घेवून जाण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नागपुरातील कस्तुरचंद पार्क मैदानावर आयोजित भारतीय प्रजासत्तादिनाच्या ७३व्या वर्धापन दिनाच्या मुख्य कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्यासह राज्य शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक,लोकप्रतिनिधी आदी यावेळी उपस्थित होते.

याप्रसंगी फडणवीस म्हणाले की, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाला दिलेले संविधान हे सर्वोच्च स्थानी असून संविधानाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत देश विविध क्षेत्रात प्रगती करीत आहे. प्रत्येक भारतीयांना अभिमान असलेल्या संविधानातील मुल्यांचा अंगीकार करून महाराष्ट्र आणि देशाचा विकास करूया,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असतांना महाराष्ट्रातही अमृतकाल साजरा होत आहे. या निमित्ताने राज्यशासनाने विकास यात्रा आरंभिली आहे. देशाच्या एकूण देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) महाराष्ट्राचा वाटा १५ टक्के असून देशाच्या एकूण निर्यातीतही २२ टक्के हिस्सा आहे. राज्यातील प्रत्येक घटकांचा या विकास यात्रेत सहभाग करून घेत महाराष्ट्राला पुढे घेवून जाण्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

नागपूर ही परिवर्तनाची भूमी आहे. शहराचा हा उज्ज्वल वारसा पुढे घेवून जाण्यात प्रत्येकाने पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. येत्या मार्च महिन्यात जी-२० परिषदेचे आयोजन नागपूर शहरात होत आहे. या निमित्ताने परदेशातून येणाऱ्या पाहुण्यांना सुंदर आणि संपन्न नागपूरचे दर्शन घडविण्याचे आवाहनही त्यांनी केले. शहरामध्ये पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण झाले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे हे शतक महोत्सवी वर्ष आहे. या निमित्ताने पार पडलेली राष्ट्रीय विज्ञान काँग्रेस आणि राष्ट्रीय फार्मास्युटीकल परिषद हे आयोजन शहराचा मान वाढविणारी ठरल्याचे फडणवीस यांनी अधोरेखित केले.

तत्पूर्वी, फडणवीस यांनी मुख्य कार्यक्रमस्थळी ध्वजारोहण करून भारतीय ध्वजास वंदन केले. त्यांनी नागपूर पोलीस, होगगार्ड, छात्रसेना, स्काऊटगाईड आदी १७ पथकांचे खुल्या जिप्सीमधून निरीक्षण केले. परेड कमांडर सहायक पोलीस आयुक्त गणेश बिरादार यांच्या नेतृत्वात या सर्व पथकांनी मुख्यमंचासमोरून पथ संचलन केले. फडणवीस यांनी या सर्व पथकांची मानवंदना स्वीकारली. अश्वदल, श्वानपथक आणि अग्नीशमनदलाचेही पथसंचलन झाले. जिल्हा क्रीडा परिषदेचा चित्ररथ या पथसंचलनात सहभागी झाला. विद्यार्थ्यांनी या चित्ररथावर मल्लखांबासह योगासनांचे प्रात्याक्षिक सादर केली.

(हेही वाचा- उद्धव ठाकरेंची शिंदेंच्या बालेकिल्लात आव्हानाची भाषा; म्हणाले….)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.