राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर टीका करणा-या विरोधी पक्षनेत्यांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा निषेध करण्यासाठी भाजपने गडचिरोली येथे आक्रोश मोर्च्याचे आयोजन केले होते. त्यावेळी फडणवीस यांनी सरकारवर जोरदार टीका केली.
कोरोना काळात गरीब, शेतक-यांना मदतीची गरज असताना, सरकारने केवळ दारूच्या दुकानदारांना मदत केल्याचा गंभीर आरोप फडणवीस यांनी यावेळी केला आहे. महाराष्ट्रात बेवड्यांचे सरकार आले असून, त्यांना गरीब, शेतक-यांपेक्षा बेवड्यांची चिंता जास्त असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.
(हेही वाचाः राज्यातील तब्बल 22 हजार कर्मचारी बेमुदत संपावर!)
शेतक-यांपेक्षा बेवड्यांची चिंता जास्त
कोरोना काळात महाराष्ट्रातील गरिबांना, बारा बलुतेदारांना, शेतक-यांना, आदिवासींना मदत करण्यासाठी आम्ही आक्रोश करत असताना, सरकारने केवळ दोनच घटकांना मदत केली. दारुच्या दुकानदारांना, बारमालकांना मदत करण्यासाठी या सरकारने प्रस्ताव आणला. कोरोना काळात बारमालकांचे नुकसान झाल्याचे सांगत त्यांनी बारमालकांच्या परवान्याची फी 50 टक्के केली. परंतु शेतक-यांच्या वीजेचं बील माफ करावं असं त्यांना वाटलं नाही. विदेशी दारू पिणा-या श्रीमंतांवर गरिबीची वेळ येत आहे त्यामुळे विदेशी दारुवरील कर अर्धा करण्याचं काम या सरकारने केलं. त्यामुळे सुधीर मुनगंटीवारांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात बेवड्यांचं सरकार आलं असून, त्यांना गरिबांची आणि शेतक-यांची चिंता नसून, बेवड्यांची चिंता जास्त असल्याचा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
(हेही वाचाः उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसला – रामदास आठवले)
हिंमत असेल तर…
कोरोना काळात मुंबई आणि पुण्यातील बिल्डरांची संपत्ती 1000 कोटीवरुन 800 कोटी झाल्यामुळे बिल्डर गरीब होत असल्याचं सांगत सरकारने बिल्डरांचं प्रिमियम रद्द केले. पण बारा बलुतेदारांना एका पैशाची मदतही सरकारने केली नाही. शेतक-याची वीज तोडण्याचा पराक्रम हे नालायक लोक करत आहेत. पण मुंबईतील बिल्डरांच्या कराची थकबाकी ही 2 हजार 300 कोटी झाली आहे, त्यामुळे सरकारमध्ये हिंमत असेल तर त्यांनी शेतक-यांचं वीज कनेक्शन तोडण्याआधी बिल्डरांकडून करवसुली करुन दाखवावी, असं आव्हानही त्यांनी ठाकरे सरकारला केलं आहे.
Join Our WhatsApp Community