डिनर डिप्लोमसी; भाजपच्या संभाव्य ९ मंत्र्यांना फडणवीसांकडून स्नेहभोजनाचे निमंत्रण

गेल्या ३७ दिवसांपासून रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला असून, मंगळवारी सकाळी ११ वाजता राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये नव्या मंत्र्यांना शपथ दिली जाणार आहे. त्याआधी सोमवारी रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कोट्यातील संभाव्य ९ मंत्र्यांना स्नेहभोजनाचे निमंत्रण दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

( हेही वाचा : १७ ऑगस्टपासून पावसाळी अधिवेशन? मंगळवारी होणार अंतिम निर्णय )

भाजपकडून पहिल्या टप्प्यात ९ मंत्री शपथ घेणार आहेत. सोमवारी सकाळीच संभाव्य मंत्र्यांना त्यासंदर्भात कळविण्यात आले असून, तातडीने मुंबईत पोहोचण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यातील काही आमदार हे मुंबईत उपस्थित होते. त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी रात्री स्नेहभोजनाचे निमंत्रण दिले आहे.

दरम्यान, भाजपच्या यादीमध्ये बहुतांश जुन्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून, स्थानिक स्वराज्य संस्थांची गणिते लक्षात घेऊन काही नव्या चेहऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, सुरेश खाडे, विजयकुमार गावित, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, गणेश नाईक यांचा पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळात समावेश असेल.

भाजपच्या यादीतील संभाव्य नावे

१) चंद्रकांत पाटील – सध्या भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी फडणवीस सरकारच्या काळात महसूल मंत्रालयाचा कारभार सांभाळला होता.

२) सुधीर मुनगंटीवार – माजी प्रदेशाध्यक्ष राहिलेल्या सुधीर मुनगंटीवार यांनी फडणवीस सरकारच्या काळात अर्थ, नियोजन आणि वन मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली होती.

३) गिरीश महाजन – गेल्या सरकारमध्ये गिरीश महाजन यांनी जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षण विभागाची धुरा सांभाळली होती.

४) ​राधाकृष्ण विखे पाटील – फडणवीस सरकारच्या शेवटच्या टप्प्यात भाजपात आलेल्या विखेंकडे गृहनिर्माण मंत्रालयाची धुरा देण्यात आली होती.

५) ​सुरेश खाडे – मिरज विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खाडे यांनी २००९, २०१४ आणि २०१९ अशी सलग तीनवेळा विधानसभा निवडणूक जिंकली आहे. ‘एससी’ समाजाचे नेते असलेल्या खाडे यांना मंत्रिपद देऊन जातीय समतोल राखण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

६) अतुल सावे – अतुल सावे हे सलग दुसऱ्यांदा विधानसभेवर निवडून आले आहेत. ते औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. आगामी औरंगाबाद महापालिका निवडणुकांच्या तोंडावर त्यांना बळ देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

७) रवींद्र चव्हाण – भाजप आणि शिंदे गटाला एकत्र आणण्यात रवींद्र चव्हाण यांचा मोठा वाटा होता. २००९ पासून सलग तीन वेळा ते डोंबिवली मतदारसंघातून निवडून आले आहेत. फडणवीस सरकारमध्ये ते राज्यमंत्री होते.

८) गणेश नाईक – २०१९ च्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. ऐरोली मतदारसंघातून त्यांनी आमदारकी मिळवली. आधी युती आणि नंतर आघाडी सरकारच्या काळात त्यांनी श्रम, उत्पादन शुल्क आणि पर्यावरण खात्याची जबाबदारी सांभाळली आहे.

९) ​विजयकुमार गावित – २०१४ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी अनेक मंत्रिपदे भूषविली आहेत. आदिवासी नेतृत्वाला पुढे आणण्याची संधी यानिमित्ताने भाजपला मिळणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here