देवेंद्र फडणवीस देशाकरिता आशेचा किरण; राज्यपालांचे सूचक विधान

93

देवेंद्र फडणवीस देशाकरिता आशेचा किरण आहेत. देवाची इच्छा असेल, तर फडणवीस देशासाठी खूप मोठे कार्य करतील, असे सूचक विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. त्यांच्या या विधानाची बुधवारी राजभवनात जोरदार चर्चा रंगली.

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ‘भगतसिंह कोश्यारी : अ सोल डेडिकेटेड टू द नेशन’ या पुस्तकाचे बुधवारी राजभवन येथे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कोश्यारी म्हणाले, असंख्य संकटे आली, तरी आपला देश आणि संस्कृती साधू, संतांच्या त्यागामुळे जिवंत आहे. प्रत्येकाने निष्ठेने आणि समर्पित भावनेने कार्य केले, तर भारत महान राष्ट्र होईल असे त्यांनी सांगितले.

ते हसत खेळत चुकीची जाणीव करून देतात – फडणवीस

करोना प्रकोपामुळे जग थांबले असताना, राज्यपाल कोश्यारी यांनी राज्यातील आदिवासी भागांचे दौरे केले, तेथे जाऊन राहिले, तेथील समस्या जाणून घेतल्या व प्रश्नांचा पाठपुरावा केला.

कोश्यारी यांनी तीन वर्षात १०७७ कार्यक्रम व ४८ विद्यापीठांच्या दीक्षांत समारोहाना उपस्थित राहून एक विक्रम केला. आपल्या कार्यपद्धतीमुळे कोश्यारी यांनी राजभवनाला लोकभवन, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

कोश्यारी हे हसत खेळत असे काही बोलतात की समोरच्याला त्याच्या चुकीची जाणीव होते. मनात स्वार्थ नसल्यामुळे कोश्यारी जे काही करतात ते समाजासाठी असते, असेही फडणवीस यांनी सांगितले.

कोश्यारींचे जीवन राष्ट्रसेवेला समर्पित

कोश्यारी यांच्या महाराष्ट्रातील तीन वर्षांच्या कार्यकाळात दोन वर्षे करोनात गेली. पण ते थांबले नाहीत.
संपूर्ण राज्यभर अविश्रांत भ्रमण करणारे, मराठी भाषा शिकून जनसामान्यांशी संवाद साधणारे व राजकारणात राहून साधेपणा जपणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राष्ट्रसेवेला समर्पित जीवन आहे. त्यांच्यावरील पुस्तक हे मानवी मूल्ये, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा व साधेपणाचे संकलन आहे. कोश्यारी हे राजभवनात मनुष्य रूपात बसलेले राज्यपालच नाहीत, तर ते एक संत आहेत, असे गौरवोद्गार माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काढले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.