महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा पुतण्यामुळे ‘काका’ अडचणीत येणार?

सहसा विरोधकांना षटकार ठोकायची एकही संधी न देणारे देवेंद्र भाऊ, आता मात्र त्यांच्या पुतण्याच्या वर्तनामुळे त्रिफळाचीत होतील की काय, असा प्रश्न आता विचारला जात आहे.

74

महाराष्ट्राच्या राजकारणात पुतण्यामुळे काका अडचणीत आल्याची अनेक उदाहरणे आपण पाहिली असतील. राज्यातील राजकारणातील काका-पुतण्यांमधील वाद देखील काही नवे नाहीत. उदाहरण द्यायचे झाले तर अजित दादांमुळे अनेकदा अडचणीत आलेले पवार साहेब, धनंजय मुंडे यांच्यामुळे गोपीनाथ मुंडे यांच्या वाढलेल्या अडचणी किंवा राज ठाकरे यांंनी शिवसेनेला धक्का दिल्यानंतर त्यांचे काका बाळासाहेब ठाकरे यांना बसलेला धक्का. अशी अनेक उदाहरणे देता येतील. मात्र आता पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात आणखी एका पुतण्याने आपल्या काकाला अडचणीत आणले आहे. हे काका दुसरे-तिसरे कोणी नसून, राज्याचे विरोधी पक्षनेते आणि सध्या ठाकरे सरकारला सळो की पळो करुन सोडत आहेत ते देवेंद्र फडणवीस. सहसा विरोधकांना षटकार ठोकायची एकही संधी न देणारे देवेंद्र भाऊ, आता मात्र त्यांच्या पुतण्याच्या वर्तनामुळे त्रिफळाचीत होतील की काय, असा प्रश्न आता विचारला जात आहे. 

तन्मय फडणवीस यांचा तो फोटो अन्…

देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे तन्मय फडणवीस यांनी लस घेतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यांनी तो काही वेळात डिलीटही केला. मात्र त्याआधीच त्याचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले. तन्मय यांचे वय 45 वर्षांपेक्षा अधिक नाही, ते फ्रंटलाईन वर्कर नाहीत, मग त्यांना कोरोनाची लस कशी मिळाली, असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जात आहे. एवढेच नाही तर, 45 वर्षांवरील लोकांनाच लस देण्याची अट मोदी सरकारने घातली आहे. असं असताना फडणवीसांच्या 45 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुतण्याला लस मिळतेच कशी? भाजप नेत्यांच्या कुटुंबीयांचा जीव महत्त्वाचा मग इतर लोक काय किडे-मुंग्या आहेत का? त्यांच्या जीवाची काहीच किंमत नाही का!, असा सवाल काँग्रेसच्या ट्विटर अकाऊण्टवरुन करण्यात आला आहे. तन्मय फडणवीस 45 वर्षांपेक्षा मोठा आहे का? फ्रंटलाईन वर्कर आहे का? आरोग्य कर्मचारी आहे का? भाजपकडे रेमडेसिवीरप्रमाणे लसींचाही गुप्त साठा आहे का? असे सवाल महाराष्ट्र काँग्रेसने उपस्थित केला आहे.

(हेही वाचाः मंत्रालयात कोरोनाची सेंन्च्युरी… अशी आहे मंत्रालयातील कोरोना रुग्णसंख्या!)

फडणवीसांनी झटकले हात

तन्मय फडणवीस माझा दूरचा नातेवाईक आहे. त्याला कोणत्या निकषानुसार लसीचा डोस मिळाला याची मला कल्पना नाही. जर हे नियमानुसार झालं असेल तर त्याच्यावर आक्षेप घेण्याचे कारण नाही. पण जर नियमावलीचे उल्लंघन झाले, तर हे अगदी अयोग्य आहे. तसेच पात्र नसल्याने माझ्या पत्नी आणि मुलीलाही लस मिळालेली नाही. प्रत्येकाने नियमांचे पालन केले पाहिजे हे माझं ठाम मत आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

(हेही वाचाः सोनू सूदने आरोग्य व्यवस्थेसमोर टेकले हात! )

कोण आहेत तन्मय फडणवीस

तन्मय फडणवीस माजी मंत्री शोभा फडणवीस यांचा नातू असून, त्याचे वय 25 वर्षांहून अधिक नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे ते पुतणे आहेत. अभिनेता असल्याचा ट्विटरवर उल्लेख असून, त्यांनी नागपुरातील ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’ येथे लस घेतल्याचा फोटो सोमवारी सोशल मीडियावर ‘व्हायरल’ झाला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.