‘प्रत्येक शिवभक्तासाठी हा अभिमानाचा क्षण’, नौदलाच्या नव्या ध्वजाबाबत फडणवीसांनी मानले मोदींचे आभार

139

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी नौदलाच्या नव्या ध्वजाचे अनावरण केले आहे. हा नवा ध्वज आपण भारतीय नौसेनेचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांना आपण समर्पित करत असल्याचे मोदी यांनी यावेळी सांगितले. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत.

फडणवीसांनी मानले आभार

प्रत्येक शिवभक्त आणि अवघ्या महाराष्ट्रासाठी हा अत्यंत अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण आहे. पारतंत्र्याची आणखी एक निशाणी आज पुसली गेली आणि त्याजागी आपल्या लाडक्या, जाणत्या राजाची, शिवछत्रपतींच्या राजमुद्रेच्या आकारातील नवी निशाणी स्थापित झाली आहे, असे ट्वीट करत देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज हे नौसेनेचे जनक

भारतीय नौदलाचा हा नवा ध्वज आपण नौसेनेचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्पित करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार उभारलं, त्यांनी नौदलाचा ख-या अर्थाने विकास केला म्हणून हा ध्वज आपण त्यांना अर्पण करत आहोत. हा नवा ध्वज भारतीय नौसेनेचे आत्मबल आणि आत्मविश्वास वाढवेल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी ध्वजाच्या अनावरण प्रसंगी व्यक्त केला आहे.

कसा आहे नवा ध्वज?

भारतीय नौदलाच्या झेंड्यावर यापूर्वी असलेले सेंट जॉर्ज क्रॉसचं चिन्ह हटवण्यात आले असून त्याऐवजी आता जहाजाचे नांगर(अँकर) असणारं चिन्ह भारतीय नौदलाच्या ध्वजावर समाविष्ट करण्यात आले आहे. हे चिन्ह छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेच्या आकारात आहे. या ध्वजावर सत्यमेव जयते आणि श नो वरुणः हे ब्रीदवाक्य लिहिले आहे. याचा अर्थ ‘जलदेवता वरुण आम्हाला आशीर्वाद देवो’, असा आहे. या ध्वजाच्या डाव्या कोप-यात भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा देखील आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.