शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला मुख्यमंत्री व्हायची इच्छा नव्हती, असं वक्तव्य करुन सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यावरुन अनेक चर्चांना उधाण आलं असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा त्यांच्या या विधानाला दुजोरा दिला. आपणंच मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंचे नाव सुचवले, असे पवारांनी सांगितले. त्यावरुन माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत पवारांवर जोरदार टीका केली आहे.
फडणवीसांची टीका
पवारांनी केलेल्या विधानावर टीका करताना फडणवीस यांनी महाभारताचा दाखला दिला आहे. द्वापारयुगात सुईच्या टोकाएवढी जमीन द्यायला नकार दिल्यामुळे महाभारत घडले आणि कलियुगात मात्र तयार नसलेल्यांना हात धरून राज्यकारभाराला लावले, असे सांगणे म्हणजे किती हा भाबडेपणा?, अशा खोचक शब्दांत फडणवीसांनी पवारांवर टीका केली आहे. तसेच साहेब! जो बूँद से गयी वो हौद से नहीं आती!, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
(हेही वाचाः माझ्या आग्रहाने उद्धव ठाकरे बनले मुख्यमंत्री! फडणवीसांच्या आरोपाचा पवारांनी केला खुलासा)
द्वापारयुगात सुईच्या टोकाएवढी जमीन द्यायला नकार दिल्यामुळे महाभारत घडले आणि कलियुगात मात्र तयार नसलेल्यांना हात धरून राज्यकारभाराला लावले, असे सांगणे म्हणजे किती हा भाबडेपणा?
साहेब ! जो बूँद से गयी वो हौद से नहीं आती !
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 16, 2021
काय म्हणाले होते पवार?
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर मुख्यमंत्री कोणाला करायचे यावर तिन्ही पक्षांच्या बैठकीत मोठा खल झाला. त्यावेळी उद्धव ठाकरे माझ्या बाजूला बसले होते. काही नावांवर चर्चा होत असतानाच मी उद्धव ठाकरे यांचा हात वर केला आणि सांगितले की हेच मुख्यमंत्री होतील. त्यामुळे उद्धव ठाकरेंना स्वतःहून मुख्यमंत्री होण्याची इच्छा नव्हती असा खुलासा शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केला.
उद्धव ठाकरेंची महत्वाकांक्षा- फडणवीस
उद्धव ठाकरेंनी भाबडेपणाचा मुखवटा उतरवला पाहिजे. मुख्यमंत्रीपदाची त्यांची महत्त्वाकांक्षा होती ती त्यांनी पूर्ण केली. त्याला तत्वज्ञानाची जोड देत आहेत. ते त्यांनी थांबवावे. शिवसेनाप्रमुखांना दिलेला शब्दच पाळायचा होता तर सुभाष देसाई, दिवाकर रावते, एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायचे होते, अशा शब्दांत फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा समाचार घेतला होता. राजकारणात महत्त्वकांक्षा असणे गैर नाही. पण त्याला तत्वज्ञानाची जोड देणे कितपत योग्य आहे? असा सवालही त्यांनी केला.
(हेही वाचाः ठाकरेंनाच मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा अन्यथा देसाई, रावतेंना करायचे होते मुख्यमंत्री!)
Join Our WhatsApp Community