शिवसेना-भाजप युती तुटली आणि उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांच्यातील मैत्रीतही कटुता आली, अशा चर्चा अनेकदा आपल्या कानावर पडतात. पण याबाबत आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, मोठे विधान केले आहे.
मी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता राजकीय विरोधक असलो, तरी आमचे वैयक्तिक संबंध फार चांगले आहेत. मी कधीही त्यांना फोन करुन त्यांच्याशी चर्चा करू शकतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. त्यांनी केलेले हे विधान, ‘ही दोस्ती तुटायची नाय…’ या गाण्याचीच आठवण करुन देणारे आहे.
काय म्हणाले फडणवीस?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा 27 जुलै रोजी वाढदिवस झाला. त्यावेळी आपण त्यांना शुभेच्छा दिल्यात का? या प्रश्नाला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. मी आणि उद्धव ठाकरे एकमेकांचे राजकीय विरोधक आता झालो आहोत. याआधी 25 वर्षे आम्ही एकत्र होतो. आता त्यांनी वेगळा मार्ग निवडला. पण आजही आमच्यातील वैयक्तिक नातं हे आहे तसंच आहे. मी कधीही त्यांना फोन करुन चर्चा करू शकतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच त्यांना फोन करुन मी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असल्याचे फडणवीस म्हणाले.
(हेही वाचाः आजोबांचे नातूही ऐकेना… आजोबांनी सांगूनही रोहित पवार पूरग्रस्त दौऱ्यावर)
अजितदादांची संधी हुकली
उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार… महाराष्ट्रातील या तिन्ही कर्तृत्त्वान नेत्यांचा जुलै महिन्यातच वाढदिवस येतो. त्यामुळे जुलैमध्ये वाढदिवस असलेले नेते राज्याचे मुख्यमंत्री होतात का? या प्रश्नाला फडणवीसांनी मिश्किलपणे हसत उत्तर दिले. अजित दादांच्या बाबतीत हे खरे ठरू शकते, पण त्यांची मुख्यमंत्री पदाची संधी अनेकदा हुकली आहे. राजकारणात इतकी वर्षे काम केल्याने त्यांना प्रशासनाचा चांगला अनुभव आहे. त्यांच्याकडे कर्तृत्त्व आणि क्षमता आहे. पण सध्या या विषयावर चर्चा करण्याची ही वेळ नाही, असेही फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्र थांबला आहे
गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या नावाखाली महाराष्ट्राचा विकास थांबलेला आहे. महाराष्ट्र सगळ्याच बाबतीत सामर्थ्यशाली आहे. पण राज्याच्या क्षमतेचा हवा तसा वापर होत नाही. राज्याचा विकास खुंटलेला आहे. त्यामुळे राज्याला उभारी देण्याचे काम राज्य सरकारने करावी, असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.
Join Our WhatsApp Community