‘उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील अजितदादांचे सरकार’; फडणवीसांची विधानसभेत टोलेबाजी

68

पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत वस्तू आणि सेवा कर विषयक (जीएसटी) विधेयक चर्चेसाठी मांडण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यात टोलेबाजी रंगली. भुजबळांच्या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीसांनी, ‘उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील अजितदादांचे सरकार’, असा उल्लेख करताच सभागृहात हशा पिकला.

(हेही वाचा : किनारपट्टीवर नाकाबंदीचे आदेश, हायअलर्ट जारी – फडणवीस )

भुजबळ म्हणाले, आत्तापर्यंत अन्नधान्यासहित जीवनावश्यक वस्तू करमुक्त होत्या. पण नव्या निर्णयामुळे पॅकिंग केलेले अन्नधान्य, पीठ, रवा, मैदा, दुग्धजन्य पदार्थ अशा अनेक जीवनावश्यक गोष्टींवर ५ टक्के जीएसटी लागू होणार आहे. केंद्रात मंजूर झालेली विधेयके तुम्ही इकडे मंजूर करून घेता. आपल्या उपमुख्यमंत्र्यांचा दरारा दिल्लीमध्ये खूपच वाढला आहे. मोठ्या कमिटीवर त्यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे त्यांनी आपले ‘वजन’ वापरून महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची महागाईबाबतची भावना तिकडे कळवावी, असेही भुजबळ म्हणाले.

फडणवीसांकडून चोख प्रत्युत्तर

भुजबळ यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना फडणवीसांनी चोख प्रत्युत्तर दिले. जीएसटीच्या दरवाढीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी एक फिटमेंट कमिटी तयार करण्यात आली होती.

त्यात राजस्थान म्हणजे काँग्रेसचे राज्य, पश्चिम बंगाल म्हणजे ममता बॅनर्जीं, तामिळनाडू म्हणजे डीएमके, बिहार म्हणजे नितीश कुमार, उत्तर प्रदेश, कर्नाटक म्हणजे भाजपाचे राज्य आणि “महाराष्ट्र म्हणजे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील अजितदादांचे राज्य,” सहभागी होते, असा टोला लगावताच सभागृहात हशा पिकला.

या फिटमेंट कमिटीने हा निर्णय घेतला. जीएसटी दरवाढीसंदर्भात काही गैरसमज आहेत. पहिल्यांदाच अन्नपदार्थांवर जीएसटी लावण्यात आला आहे, हाही गैरसमज आहे. व्हॅट पद्धतीमध्येही कर लागू होता. तेव्हा राज्यांना अधिकार होता,” असेही फडणवीस म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.