लवंगी की ‘अ‍ॅटम बॉम्ब’ लवकरच कळेल… फडणवीसांचं उत्तर की ‘धमकी’?

राऊतांकडे खूप वेळ असतो पण ते सरकारी व्यक्ती नसल्याचेही फडणवीस म्हणाले.

95

राज्यात सध्या राजकीय वातावरण तापलेले असताना भाजपच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेत राज्यात घडलेल्या १०० घटनांची माहिती दिली. मात्र यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या फडणवीस यांचे आरोप फुसक्या लवंगीसारखे असल्याच्या आरोपाला जोरदार उत्तर दिले. केंद्रीय गृहसचिवांना दिलेला महाराष्ट्रातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या रॅकेटबद्दलचा अहवाल हा फुसकी लवंगी होती की, अ‍ॅटम बॉंब होता हे लवकरच कळेल, असं फडणवीस यावेळी म्हणाले. कालच देवेंद्र फडणवीस राज्यात बदल्यांचे रॅकेट कसे चालते याबाबत त्यांच्याकडे असलेला सगळा डेटा घेऊन दिल्ली दरबारी गेले होते. त्यामुळे आता फडणवीसांनी राऊतांना दिलेले उत्तर होते की ‘डेटा बाँब’ची धमकी, असा प्रश्न आता उभा ठाकला आहे.

मुख्यमंत्र्यांचे मौन

ज्या प्रकारच्या घटना महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत बाहेर येतात त्या राज्यासाठी चिंताजनक आहेत. त्यामध्ये हप्ता वसुली, ट्रान्सफर रॅकेट सारखे प्रकरण, कोरोना प्रकरण हाताळण्यात आलेले अपयश आणि बिघडलेली कायदा-सुव्यवस्था या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी मौन धारण केले आहे. एक शब्दही मुख्यमंत्री यावर बोलत नाहीत. म्हणूनच राज्यपालांना भेटून राज्यात घडलेल्या १०० घटनांची माहिती आम्ही राज्यपालांना दिल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

(हेही वाचाः संजय राऊत म्हणाले, ती तर भिजलेली ‘लवंगी’!)

राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना बोलते करावे

मुख्यमंत्री सगळ्या प्रकरणावर काहीच बोलत नाहीत. म्हणूनच राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना अहवालाच्या माध्यमातून बोलतं करुन घ्यावे, अशी मागणी आम्ही राज्यपालांना केल्याचेही फडणवीस यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री जर बोलत नसतील तर संविधानिक प्रमुख म्हणून राज्यपालांनी बोलावे, अशी मागणी भाजपकडून राज्यपालांना करण्यात आली. हप्ता वसुली, ट्रान्सफर रॅकेट आणि कोरोना रोखण्यात असलेले अपयश याचा अहवाल राज्यपालांना मुख्यमंत्र्यांनी द्यावा, अशी मागणी भाजपने केली. राज्यपालांना हा अधिकार असल्याचेही ते म्हणाले.

काँग्रेस अस्तित्वहीन पक्ष

काँग्रेस हा अस्तित्वहीन पक्ष आहे. या सरकारमध्ये काँग्रेसचा हिस्सा किती हे त्यांनी सांगावे, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. काँग्रेस अस्तित्वातच नसल्यासारखं चित्र आहे. काँग्रेसचे दिल्लीतील नेते वेगळे बोलतात. इथले नेते वेगळे बोलतात. केवळ सत्तेसाठी हे सगळे एकत्र आहेत बाकी काही नाही, असा टोला फडणवीसांनी काँग्रेसला लगावला.

(हेही वाचाः गृहमंत्र्यांमुळे आता काँग्रेसमध्येही दोन गट!)

राऊतांकडे खूप वेळ आहे

या सरकारने नैतिकता पायाखाली तुडवली आहे. आपल्या सरकारला वाचवण्यासाठी आणि हप्ते वसुलीसाठी हे सर्व सुरू असल्याचे म्हणत संजय राऊत यांच्या सर्व प्रश्नांना उत्तरं देण्याइतके ते मोठे नेते नाहीत, अशी टीका देखील फडणवीस यांनी यावेळी केली. राऊतांकडे खूप वेळ असतो पण ते सरकारी व्यक्ती नसल्याचेही फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री तोंड लपवून का बसलेत- भातखळकर

सध्या सुरू असलेल्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी बोलण्यासारखे काय आहे, असा प्रश्न संजय राऊतांना पडला आहे. ठाकरे सरकारची लफडी बाहेर आल्यापासून मुख्यमंत्री तोंड लपवून का बसलेत हा प्रश्न जनतेला पडला आहे, अशी टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

(हेही वाचाः नरेंद्र पाटलांना शिवसेना सोडायला भाग पाडणारे ‘ते’ नेते कोण?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.