उद्धव ठाकरे सचिन वाझेंचे वकील, मुख्यमंत्र्यांच्या टीकेला फडणवीसांचा टोला!

सचिन वाझेंकडे अशी काय माहिती आहे की त्यांना वाचवले जात आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

सचिन वाझे यांना वकिलाची गरज नाही आहे. कारण स्वतः मुख्यमंत्री वाझेंकडून जोरदार बॅटिंग करत आहेत. ते त्यांचे वकील आहेत, असा आरोप फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सचिन वाझे काय ओसामा बिन लादेन आहे का? असा संतप्त सवाल विरोधकांना विचारत जोरदार टीका केली होती. यावर उत्तर देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टोला हाणला. गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही सचिन वाझेंच्या निलंबनाची मागणी करत आहोत. मात्र ठाकरे सरकावर यावर निर्णय घेत नसल्याचं दिसते असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली. तसेच सचिन वाझेंकडे अशी काय माहिती आहे की त्यांना वाचवले जात आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

आणखी काय म्हणाले फडणवीस

काही दिवसांपूर्वी ठाकरे सरकारने वीज कनेक्शन कापणार यावर स्थगिती देण्यात आली होती, मात्र अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ही स्थगिती उठवणे, ही मोठी लबाडी असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. आज ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना वीजेचा शॉक दिला आहे. शेतकऱ्याला कर्जमुक्त करू असं म्हटलं होतं, मात्र शेतकऱ्याला एक नवा पैसा देण्यात आला नाही. राज्यात शेतक-यांची पूर्ण फसवणूक सरकारने केली आहे. पीक विम्यासंदर्भात चुकीची माहिती देण्यात आली. पीक विम्याचे निकष ठरवणे व त्याचे टेंडर काढणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. प्रत्येक राज्य आपआपल्या राज्याचे टेंडर काढते. मात्र राज्य सरकारने टेंडर बदलले. परिणामी फायदा विमा कंपन्यांना झाला, शेतकऱ्यांना झाला नाही. राज्य सरकार केंद्र सरकारकडे बोट दाखवते आणि स्वत: मूग गिळून गप्प बसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ठाकरे सरकार हे लबाड सरकार असून, इतिहासात ठाकरे सरकारचे नाव लबाड सरकार म्हणून नोंदवलं जाईल, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः सचिन वाझे ओसामा बिन लादेन आहे का? मुख्यमंत्री विरोधकांवर संतापले!)

वाझेंकडे असं काय आहे?

सचिन वाझेंकडे अशी काय माहिती आहे, ज्यामुळे सरकार त्यांना एवढं वाचवत आहे. सचिन वाझेंविरोधात इतके पुरावे देऊन सुद्धा त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही. वाझेंकडे नक्कीच असं काहीतरी आहे की ते सरकार हलवूही शकतात आणि घालवूही शकतात. वाझेंचं नाव आल्यानंतरच डेलकरांच्या आत्महत्येबाबत गुन्हा दाखल का करण्यात आला. डेलकरांच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरुन त्यांच्या आत्महत्येबाबत गुन्हा दाखल केला जातो पण, मनसुख हिरेन यांच्या पत्नीने वाझेंनीच आपल्या पतीचा खून केल्याचा संशय व्यक्त केल्याबद्दल वाझेंवर कारवाई का सुरू केली जात नाही. असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here