शिंदेंना यशस्वी मुख्यमंत्री करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार- फडणवीस

राज्यात शिंदे गट-भाजप सरकारच्या युतीचं सरकार आता स्थापन झाले आहे. त्यामुळे या नव्या युती सरकारचं अभिनंदन करण्यात येत आहे. या विजयानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूरात जंगी स्वागत करण्यात आले. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच एकनाथ शिंदे यांना एक यशस्वी मुख्यमंत्री करण्यासाठी मी माझ्याकडून सर्व प्रयत्न करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव माझा

विरोधी पक्षनेता म्हणून काम करत असताना सरकारमधला अंतर्विरोध मला दिसत होता. शिवसेनेत जी नाराजी होती ती कानावर पडत होती. शिवसेनेच्या जोरावर इतर पक्ष मजबूत होत होते, हे शिवसेनेचे आमदार, खासदार बघत होते. शिवसेनेचा जो विचार होतो तो कुठेतरी पायदळी तुडवला जातोय, अशी भावना त्यांच्या मनात होती. त्यातूनच शिवसेनेत उठाव झाला आणि त्याला आम्ही साथ दिली. हे बंड नव्हतं तर तो एक उठाव होता. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय भाजपने घेतला. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव मी स्वतः भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडे दिला आणि त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मान्यता दिली, असे देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना सांगितले.

(हेही वाचाः आम्ही रिक्षावाले असल्याचा आम्हाला अभिमान, फडणवीसांचे उद्धव ठाकरेंना चोख प्रत्युत्तर)

मी सर्वतोपरी प्रयत्न करणार

मात्र, त्यावेळी मी सरकार बाहेर राहीन, असं ठरलं होतं. पण पत्रकार परिषदेनंतर जेव्हा मी घरी गेलो तेव्हा जे.पी.नड्डा, अमित शहा आणि पंतप्रधान मोदी यांनी सरकारमध्ये जाण्याचा आग्रह धरला आणि त्यांच्या आदेशाचा मान ठेऊन मी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या गोष्टीचा मला कमीपणा नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मी काम केलंय. आज त्यांच्या नेतृत्वात मी काम करणार आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून सफल होणारच आणि त्यासाठी मी माझ्याकडून सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मविआने विकासाला लावला ब्रेक

महाराष्ट्रात 2019 ला जनतेने भाजप-शिवसेना युतीला बहुमत देण्यात आलं होतं. पण ते बहुमत छद्मीपणे पळवून नेऊन अनैसर्गिक सरकार स्थापन करण्यात आलं. पण मला मुख्यमंत्री होता आलं नाही, याचं मला दुःख झालं नाही. पण आलेल्या सरकारने महाराष्ट्राच्या विकासाच्या गतीला आडकाठी आणल्यामुळे मला सरकार गेल्याचं दुःख झालं होतं, असंही फडणवीस यावेळी म्हणाले.

(हेही वाचाः रिक्षावाल्याच्या रिक्षेला ब्रेक नव्हता, उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here